मुंढव्यात कचरा जाळण्याचा धूर कायम; महापालिकेची कारवाई मात्र धुरातच!

मुंढव्यात कचरा जाळण्याचा धूर कायम; महापालिकेची कारवाई मात्र धुरातच!

वारंवार तक्रारी, व्हिडीओ पुरावे देऊनही प्रशासन सुस्त; आगीच्या ज्वाळा आता झाडाझुडपांपर्यंत

पुणे : मुंढवा परिसरात उघड्यावर कचरा जाळण्याचे प्रकार सुरूच असून, यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत असताना पुणे महापालिका प्रशासन मात्र सुस्त असल्याचे चित्र दिसत आहे. वारंवार तक्रारी करून, घटनांचे व्हिडीओ पुरावे पाठवूनही ठोस कारवाई होत नसल्याने महापालिकेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा परिसरात कचरा जाळला जात असल्याचे समोर आले.

विशेष म्हणजे, कचरा जाळण्याच्या आगीची झळ आता परिसरातील झाडांना आणि झुडपांनाही बसू लागली आहे. त्यामुळे केवळ प्रदूषणाचाच नव्हे, तर परिसरातील हिरवळीच्या अस्तित्वाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे पर्यावरण संवर्धनाचे संदेश दिले जातात, वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबवले जातात; मात्र दुसरीकडे डोळ्यांसमोर झाडाझुडपांजवळ कचरा जाळला जात असताना संबंधित यंत्रणा नेमकी काय करत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

याच ठिकाणी यापूर्वीही अनेकदा कचरा जाळल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. नागरिकांनी हे व्हिडीओ महापालिकेकडे पाठवून वारंवार तक्रारीही केल्या. मात्र, तक्रारींची दखल घेऊन प्रत्यक्ष कारवाई करण्याऐवजी प्रशासनाकडून केवळ बघ्याची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

नागरिकांनी पुरावे द्यायचे, तक्रारी करायच्या आणि महापालिकेने मात्र दुर्लक्ष करायचे, हाच कारभार सुरू राहणार का? कचरा जाळण्याचे प्रकार रोखण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, तसेच वारंवार तक्रारी होऊनही संबंधितांवर कारवाई का होत नाही, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

कचरा जाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करून हा प्रकार तातडीने थांबवावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. अन्यथा, मुंढव्यात कचरा जाळण्याचा धूर असाच निघत राहील आणि महापालिकेच्या कारवाईचे आश्वासनही धुरातच विरून जाईल, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!