मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी तुषार हंबीर फुरसुंगीतून जेरबंद

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी तुषार हंबीर फुरसुंगीतून जेरबंद

व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न आणि खंडणी मागितल्याचा आरोप; पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

हडपसर : व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तसेच खंडणी मागितल्याच्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या तुषार नामदेव हंबीर (वय ४०, रा. गोंधळेनगर, हडपसर) याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने फुरसुंगी परिसरातून अटक केली. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आलेल्या या गुन्ह्यातील आरोपीला २४ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले.

पिस्तुलाची नळी तोंडात घालून जीवे मारण्याची धमकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कापूरहोळ ते नारायणपूर रस्त्यावर गुरुकृपा मेडिकलसमोर ही घटना घडली. फिर्यादी यांचा मुलगा पृथ्वीराज हा ॲक्टिव्हा दुचाकीवरून घरी जात असताना एका कारचालकाने त्याच्या दुचाकीला कार आडवी घातली. त्यानंतर कारमधील इतर आरोपींनी त्याला जबरदस्तीने कारमध्ये बसवून अपहरण केले. यावेळी आरोपींनी त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. तसेच, ‘तुम्ही आमच्यावर केसेस करणार, मग आम्ही तुम्हाला सोडणार का?’ अशी धमकी देत त्याच्या तोंडात पिस्तुलाची नळी घातली. या प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यात विविध कलमांसह मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाईल सिमकार्ड आणि राहण्याची ठिकाणे बदलून पोलिसांना गुंगारा

या गुन्ह्यातील तुषार नामदेव हंबीर हा घटनेपासून फरार होता. अटकेपासून बचाव करण्यासाठी तो वारंवार राहण्याची ठिकाणे बदलत होता. तसेच वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल सिमकार्ड वापरत असल्याने त्याचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला फरार आरोपीचा शोध घेऊन अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी हडपसर परिसरात येणार असल्याची माहिती मिळवली. त्यानंतर सापळा रचून त्याला फुरसुंगी परिसरातून ताब्यात घेतले.

खून, दरोडा, आर्म्स ॲक्टसह गंभीर गुन्हे दाखल

अटक करण्यात आलेल्या तुषार हंबीर याच्यावर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा आणणे, मारामारी आणि आर्म्स ॲक्ट अशा विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, डॉ. शुभम कुमार आणि भोर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक युवराज धोंडे तसेच पोलीस अंमलदार रामदास बाबर, संतोष तोडकर, राजू मोमीन, अमोल शेडगे, तुषार भोईटे, चेतन पाटील आणि भारत मोहळ यांच्या पथकाने केली.

या गुन्ह्याचा पुढील तपास भोर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर करीत आहेत.

 

 

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!