
सारसबागेसमोर तीन दिवसांपासून उभ्या कारमध्ये तरुणाचा मृतदेह; दुर्गंधीमुळे उघड झाला प्रकार
शुभम बनसोडे असे मृत तरुणाचे नाव; खडक पोलिसांकडून तपास सुरू
पुणे : पुण्यातील वर्दळीच्या सारसबाग परिसरातील नेहरू स्टेडियमसमोर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून उभ्या असलेल्या बंद कारमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कारमधून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्यानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी कारचा दरवाजा उघडून पाहिला असता आतील सीटवर तरुणाचा फुगलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.
मृत तरुणाचे नाव शुभम बनसोडे असे असून, तो काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. नेहरू स्टेडियमसमोरील रस्त्यावर ही कार गेल्या दोन ते तीन दिवसांपासून एकाच ठिकाणी उभी होती. सुरुवातीला नागरिकांचे त्याकडे फारसे लक्ष गेले नाही. मात्र, गुरुवारी (दि. ३०) कारमधून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येऊ लागल्याने नागरिकांना संशय आला. त्यांनी तत्काळ खडक पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.
माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. कारची तपासणी केली असता आत तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृतदेह दोन ते तीन दिवसांपासून बंद कारमध्ये असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, शुभम बनसोडे याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, संबंधित कार घटनास्थळी कोणी आणून उभी केली, याचाही शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे सारसबाग परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

