हडपसर महावितरणात लाचखोरीचा स्फोट!

हडपसर महावितरणात लाचखोरीचा स्फोट!

  • अतिरिक्त कार्यकारी अभियंता ७,५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात;
  • फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,
  • कार्यकाळातील सर्व वीजजोडण्या व मालमत्तेच्या चौकशीची मागणी

पुणे,  हडपसर येथील महावितरण कार्यालयातील भ्रष्टाचाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, नवीन वीजमीटर जोडणीसाठी लाचेची मागणी करणाऱ्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडल्याने महावितरणच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर उपविभाग-२ येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता रामचंद्र नारायण लोंढे (वय ४२) यांनी एका इलेक्ट्रिकल सब-कॉन्ट्रॅक्टरकडे नवीन १२ वीजमीटर जोडणीच्या कामासाठी १२ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर विभागाने पडताळणी करून सापळा रचला.

तपासादरम्यान आरोपी अधिकाऱ्याने मागितलेल्या लाचेपैकी ४ हजार ५०० रुपये यापूर्वी स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर उर्वरित ७ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवारी दुपारी हडपसर येथील महावितरण कार्यालयात करण्यात आली.

वीजजोडणीसाठी ठरले होते ‘रेटकार्ड’?

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, नवीन १२ वीजमीटर जोडण्याच्या कामासाठी प्रति मीटर १ हजार रुपये या दराने १२ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर दुसऱ्या एका नव्या इमारतीच्या वीजजोडणीसाठी तब्बल ५० हजार रुपयांची मागणी केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे महावितरणच्या काही कार्यालयांमध्ये वीजजोडणीसाठी अनधिकृत ‘रेटकार्ड’ सुरू होते का, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

नागरिकांमध्ये संतापाची लाट

सामान्य नागरिकांना वीजजोडणी, मीटर बसविणे, लोड वाढविणे यासारख्या मूलभूत सेवांसाठी अधिकृत शुल्क भरल्यानंतरही अतिरिक्त पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे महावितरणच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

केवळ अटक नव्हे, संपूर्ण कारभाराची चौकशी करा!

या कारवाईनंतर हडपसर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, अतिरिक्त कार्यकारी अभियंता रामचंद्र लोंढे यांच्या संपूर्ण कार्यकाळाची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

सामाजिक कार्यकर्ते सुरेश हिंगणे आणि मोहन बालाई यांनी लोंढे यांच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आलेल्या सर्व नवीन वीजजोडणी प्रकरणांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच वीजजोडणी, मीटर मंजुरी, डीपी मंजुरी, लोड वाढविणे आणि इतर तांत्रिक कामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला आहे का, याचाही तपास करण्यात यावा, असे त्यांनी म्हटले आहे.

यासोबतच लोंढे यांच्या नावावरील तसेच कुटुंबीयांच्या नावावरील चल-अचल मालमत्ता, बँक खाती, आर्थिक व्यवहार, गुंतवणूक आणि उत्पन्नाच्या स्रोतांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

‘एकाच अधिकाऱ्याला पकडून भ्रष्टाचार संपणार नाही’

“एका अधिकाऱ्याला लाच घेताना पकडणे ही केवळ सुरुवात आहे. त्यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या सर्व वीजजोडणींची, आर्थिक व्यवहारांची आणि मालमत्तेची चौकशी झाल्यास अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ शकतात. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी सुरेश हिंगणे आणि मोहन बालाई यांनी केली आहे.

दरम्यान, एसीबीच्या या कारवाईनंतर महावितरणच्या हडपसर विभागातील कामकाज, मंजुरी प्रक्रिया आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!