
दिव्यांग विद्यार्थी व दिव्यांग पालकांच्या मुलांना शिक्षणासाठी मदतीचा हात
पुणे : डोळ्यांना प्रकाश नसला तरी जिद्द, आत्मविश्वास आणि शिक्षणाची उर्मी असेल तर कोणतेही स्वप्न गाठता येते, याची प्रचिती शनिवारी पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे पाहायला मिळाली. प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या अंध व दिव्यांग विद्यार्थ्यांसह दिव्यांग पालकांच्या मुलांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरणाऱ्या उपक्रमात स्टारलाईट दिव्यांग ट्रस्टच्या वतीने तब्बल ३५० लाभार्थ्यांना शालेय दप्तर, वह्या आणि पुस्तके वाटप करण्यात आली.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमात अंध व दिव्यांग विद्यार्थी तसेच दिव्यांग व्यक्तींच्या मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. शिक्षणासाठी आवश्यक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले, तर पालकांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू तरळले.
समाजातील अनेक अंध व दिव्यांग विद्यार्थी तसेच दिव्यांग पालकांची मुले आर्थिक अडचणी, शारीरिक मर्यादा आणि विविध आव्हानांवर मात करत शिक्षणाची वाटचाल करत आहेत. अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवासात आधार मिळावा आणि त्यांचा आत्मविश्वास अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने स्टारलाईट दिव्यांग ट्रस्टने हा स्तुत्य उपक्रम राबविला. “दिव्यांगत्व ही मर्यादा नसून जिद्दीची आणि संघर्षाची ओळख आहे,” हा प्रेरणादायी संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाला ससून रुग्णालयाचे हेड कन्सल्टंट डॉ. किरण जाधव, सामाजिक कार्यकर्ते अजहर मुस्ताक शेख, माजी नगरसेवक प्रमोद निनारिया, वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष सागर आळ्हाट, बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ व्यवस्थापक विजय कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाच्या माध्यमातून जीवनात मोठी भरारी घेण्याचे आवाहन केले.
स्टारलाईट दिव्यांग ट्रस्टचे चेअरमन आतीक सय्यद, मिलिंद आल्हाट, संचालिका पल्लवी नितीन भालशंकर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. समाजातील दुर्बल, वंचित आणि दिव्यांग कुटुंबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सातत्याने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद, पालकांच्या मनातील समाधान आणि समाजातील संवेदनशील व्यक्तींच्या सहकार्याची भावना हेच या उपक्रमाचे खरे यश ठरले. समाजात संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणाविषयीची जाणीव जपणारे असे उपक्रमच दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आणि दिव्यांग पालकांच्या मुलांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण करतात, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

