
लोहगावात अतिक्रमणाविरोधात महापालिकेचा बडगा; धडक कारवाईने खळबळ
२१ हजार ८०० चौरस फूट अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त; पूर्वपरवानगीशिवाय बांधकाम करणाऱ्यांना महापालिकेचा इशारा
पुणे,
पुणे महानगरपालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करत लोहगाव परिसरात धडक कारवाई केली. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने तब्बल २१ हजार ८०० चौरस फूट अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवत ते जमीनदोस्त केले. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून बेकायदा बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
मंगळवारी सकाळी उपआयुक्त सोमनाथ बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी बांधकाम विकास विभागाचे सहशहर अभियंता मंगेश गावडे, उपअभियंता विवेक डुंबळे, कनिष्ठ अभियंता संतोष लांजेकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, पोलीस आणि तांत्रिक पथक उपस्थित होते.
कारवाईसाठी दोन जेसीबी, एक ब्रेकर मशीन, सात पोलीस अधिकारी, नऊ पोलीस कर्मचारी, दोन एसआरपीएफ जवान, सहा ‘जीवनी’ पथक कर्मचारी, दोन रेस्क्यू कर्मचारी आणि १५ मजूर तैनात करण्यात आले होते. कडेकोट पोलीस बंदोबस्तात संपूर्ण कारवाई पार पडली.
उपआयुक्त सोमनाथ बनकर यांनी नागरिकांना स्पष्ट इशारा देत सांगितले की, महापालिकेची पूर्वपरवानगी न घेता कोणतेही बांधकाम करू नये. परवानगीशिवाय उभारण्यात आलेले बांधकाम आढळल्यास कोणतीही तडजोड न करता नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.
महापालिकेच्या या कारवाईमुळे शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. नियमांना डावलून उभारण्यात येणाऱ्या बांधकामांवर यापुढेही अशीच धडक कारवाई सुरू राहणार असल्याचा स्पष्ट संदेश महापालिकेने या मोहिमेतून दिला आहे.

