
पुण्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; शाळेजवळ गोळीबाराने दहशत
पुणे : शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री सहकारनगर परिसरात भररस्त्यात गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. शिंदे हायस्कूलजवळ झालेल्या या गोळीबारात योगेश बणेकर हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास शिंदे हायस्कूलजवळील एका मेडिकल दुकानासमोर काही अज्ञात हल्लेखोरांनी अचानक गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज होताच परिसरात एकच खळबळ उडाली. रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक आणि स्थानिक रहिवाशांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली.
या गोळीबारात योगेश बणेकर गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि पोलिसांच्या तत्परतेने त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांचे पथक त्याच्यावर उपचार करत असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
जुन्या वादातून हल्ल्याची शक्यता
घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली. पोलिसांकडून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून प्राथमिक तपासात हा गोळीबार जुन्या वादातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
हल्लेखोरांची ओळख पटविण्यासाठी आणि त्यांच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके कार्यरत आहेत.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
पुणे शहरात गेल्या काही दिवसांत गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरवस्तीत आणि शाळेसारख्या सार्वजनिक ठिकाणाजवळ झालेल्या या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासन कोणती ठोस पावले उचलणार, याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

