रुपाली चाकणकर आक्रमक; बदनामी केलेल्या महिलेला थेट कोर्टात खेचलं

रुपाली चाकणकर आक्रमक; बदनामी केलेल्या महिलेला थेट कोर्टात खेचलं

मुंबई : राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा Rupali Chakankar यांनी आशा मिरगे यांच्याविरोधात कायदेशीर पाऊल उचलत नोटीस पाठवली आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणात आशा मिरगे यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून, त्यामध्ये असभ्य आणि अश्लील भाषेचा वापर करण्यात आल्याचा आरोप चाकणकर यांनी केला आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत चाकणकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, अशोक खरातच्या कोणत्याही आर्थिक व्यवहारांशी किंवा जमीन व्यवहारांतील भागीदारीशी त्यांचा दूरान्वयेही संबंध नाही. गेल्या काही दिवसांपासून कोणताही पुरावा नसताना त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर करण्यात आलेले आरोप वेदनादायक असल्याचे त्यांनी म्हटले.

चाकणकर यांच्या म्हणण्यानुसार, 4 एप्रिल रोजी आशा मिरगे यांना पहिली कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र, मिरगे यांनी ती स्वीकारली नाही. पोस्टाद्वारे तीन वेळा नोटीस पाठवूनही ती “अनक्लेम” म्हणून परत आल्याने अखेर Mazgaon Court येथे फौजदारी फिर्याद दाखल करावी लागल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच, आशा मिरगे यांना 2 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

चाकणकर म्हणाल्या की, अशोक खरात प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि पारदर्शक व्हावा यासाठी त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह पक्षातील प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला होता. मात्र, त्यानंतरही त्यांच्याविरोधात चिखलफेक सुरूच राहिली. त्यामुळे आता ही लढाई पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत राहून लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, भोंदू अशोक खरात प्रकरण आणि त्यासंदर्भातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!