FDA ची धडक कारवाई; पुणे-कोल्हापूरमध्ये 24.81 लाखांचा माल जप्त

FDA ची धडक कारवाई; पुणे-कोल्हापूरमध्ये 24.81 लाखांचा माल जप्त

पुणे/कोल्हापूर : अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांत मोठी कारवाई करत तब्बल 24.81 लाख रुपये किमतीचा बेकायदा औषधसाठा जप्त केला आहे. राज्यभर भेसळयुक्त खाद्यपदार्थ आणि औषधांवरील तपासणी मोहीम सुरू असताना ही कारवाई करण्यात आली.

कोल्हापूरमधील एका कंपनीवर टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात अॅलोपॅथिक औषधे, प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) आणि इंजेक्शन्सचा साठा आढळून आला. तपासादरम्यान संबंधित संस्थेकडे औषधांच्या खरेदी-विक्रीसाठी आवश्यक परवाने आणि वैध कागदपत्रे नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी औषधांचे नमुने तपासणीसाठी घेतले असून 29 प्रकारच्या औषधांचा सुमारे 13.60 लाख रुपये किमतीचा साठा जप्त केला.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील वडकी येथील एका औषध कंपनीच्या गोदामाची तपासणी करण्यात आली. यावेळी ‘रेक्टीन प्लस टॅब्लेट’ या शेड्युल-एच अंतर्गत येणाऱ्या प्रिस्क्रिप्शन औषधाच्या पॅकेजिंगवर नियमबाह्य जाहिरात करण्यात आल्याचे आढळून आले. याप्रकरणी संबंधित औषधाचा 11.19 लाख रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला.

FDA चे नागरिकांना आवाहन

अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना पुढील सूचना दिल्या आहेत:

  • औषधे केवळ अधिकृत व परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावीत.
  • औषध उत्पादक आणि विक्रेत्यांनी सर्व कायदे व नियमांचे काटेकोर पालन करावे.
  • संशयास्पद औषध विक्री किंवा बेकायदेशीर साठ्याची माहिती तात्काळ प्रशासनाला द्यावी.

जनतेच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांना इशारा

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, राज्यात औषध उत्पादन, साठवण, वितरण आणि विक्री क्षेत्रातील कोणतीही बेकायदेशीर बाब सहन केली जाणार नाही. जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर आणि सातत्यपूर्ण कायदेशीर कारवाई सुरूच राहणार आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!