
पुणे जिल्ह्यात गर्भलिंग निदान आणि भ्रूणहत्येचे मोठे रॅकेट उघड
पुणे, पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपाताचे धक्कादायक रॅकेट उघडकीस आले असून, या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून, गेल्या दोन वर्षांत सुमारे ५०० बेकायदेशीर गर्भपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील केडगाव परिसरातील एका साध्या घरातून हे संपूर्ण रॅकेट चालवले जात होते. बाहेरून सामान्य घर वाटणाऱ्या या ठिकाणी पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, वैद्यकीय साहित्य, औषधे आणि इंजेक्शन्सच्या मदतीने गर्भलिंग तपासणी व बेकायदेशीर गर्भपात केले जात होते.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, ३५ ते ५० हजार रुपयांच्या बदल्यात गर्भलिंग तपासणी केली जात होती. मुलगी असल्याचे समजताच अनेक महिलांवर गर्भपातासाठी दबाव टाकला जात असल्याचेही समोर आले आहे. या अमानुष प्रकारात अनेक निष्पाप गर्भांचा बळी गेला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणात पोलिसांनी सर्वप्रथम २० मे रोजी बोगस डॉक्टर अण्णासाहेब गिरी याला केडगाव परिसरातून अटक केली. त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनंतर २४ मे रोजी वाघोली परिसरातून डॉक्टर जाधव यालाही ताब्यात घेण्यात आले. या दोघांनी मिळून गर्भलिंग निदान आणि भ्रूणहत्येचे संघटित जाळे उभे केल्याचा आरोप आहे.
दोन्ही आरोपींना दौंड न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
पोलिसांनी आरोपींविरोधात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (PCPNDT) कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून, या रॅकेटशी संबंधित इतर व्यक्तींचाही शोध घेतला जात आहे. या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, मुलींना जन्मापूर्वीच संपविणाऱ्या या अमानुष प्रकाराविरोधात सामाजिक संघटना आणि नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

