
४८ तासांत अवैध दारू माफियांवर कारवाई करा; अन्यथा शिवसेनेचा हल्लाबोल.
मना न्यूज नेटवर्क
हडपसर,
अवैध दारू हातभट्ट्यांवर शिवसेनेने केलेल्या धडक कारवाईनंतर पुणे शहरातील सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर पुढे येत असून बेकायदा दारू विक्री, हातभट्ट्या आणि बनावट दारू निर्मिती केंद्रांची माहिती स्वतःहून शिवसेनेकडे देत आहेत. कालपर्यंत पुणे शहरातील तब्बल ४२ अवैध दारू अड्ड्यांची माहिती शिवसेनेला प्राप्त झाली. शहरातील अनेक भागांमध्ये अवैध दारू माफियांचे जाळे किती खोलवर रुजले आहे, याचा धक्कादायक खुलासा होत आहे.
याबाबत शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे म्हणाले की,”हडपसरमध्ये आम्ही नऊ अवैध दारू हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्यानंतर पुणेकर नागरिक स्वतःहून पुढे येऊन माहिती देत आहेत. शहरातील सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावर चालताना अवैध दारू अड्डे दिसतात, पण पुणे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला ते दिसत नाहीत, हे आश्चर्यकारक आहे. या दारू माफियांना नेमका कुणाचा वरदहस्त आहे, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे. पुणेकरांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना संरक्षण देणाऱ्यांनाही जनतेसमोर उघडे पाडल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही,” असा घणाघात त्यांनी केला.
नऊ ठिकाणी अवैध दारू हातभट्ट्या उध्वस्त करून प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर नागरिकांकडून वारजे, हडपसर, वाघोली, विमाननगर, ताडीवाला रस्ता आणि कोथरूड परिसरातील अनेक ठिकाणी अवैध दारू निर्मिती व विक्री सुरू असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर प्राप्त झाल्या आहेत. जनतेच्या जीवाशी थेट खेळणारा हा प्रकार असून प्रशासनाने याकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत गंभीर असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
नागरिकांकडून प्राप्त माहितीनुसार वारजे येथील रामनगर, गोसावी वस्ती, गणेशपुरी सोसायटी, सहयोग नगर, गोकुळ नगर आणि म्हाडा सोसायटी परिसर, हडपसरमधील गाडीतळ जुना अड्डा, पुणेकर मळा, कानडे नगर, वडाचीवाडी स्मशानभूमीमागील परिसर, होळकरवाडी येथील पिंजण वस्ती परिसर, वाघोलीतील वाडेबोल्हाई, अष्टापूर व भावडी परिसर, ताडीवाला रस्ता परिसरातील खड्डा झोपडपट्टी, विमाननगरमधील साईनाथ नगर, खुळेवाडी, बरमाशील म्हाडा रस्ता तसेच कोथरूडमधील सुतारदरा व किश्किंदा नगर दुसरी गल्ली येथे राजरोसपणे अवैध दारू हातभट्ट्या आणि गावठी बनावट दारू विक्री सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
या सर्व प्रकरणांची गांभीर्याने दखल घेत पुणे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुढील ४८ तासांत संयुक्त मोहीम राबवून पुणे शहरातील अवैध दारू हातभट्ट्या, बनावट दारू निर्मिती केंद्रे, विक्री अड्डे आणि दारू माफियांचे संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करावे, अशी शिवसेनेची ठाम मागणी आहे. केवळ कागदी कारवाई न करता प्रत्यक्ष मैदानात उतरून धडक मोहीम राबविण्याची वेळ आता प्रशासनावर आली असल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले आहे.
“पुढील ४८ तासांत प्रशासनाने कारवाई केली नाही, तर नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे शिवसेना पुणे शहरातील प्रत्येक अवैध दारू अड्ड्यावर थेट हल्लाबोल करेल. जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या दारू माफियांना कोणतीही सूट दिली जाणार नाही. त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी पुणे पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची असेल,” असा निर्वाणीचा इशारा प्रमोद भानगिरे यांनी दिला. तसेच पुणे शहरात अवैध दारू माफियांचा सुळसुळाट कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नसून शिवसेनेचा हा लढा अधिक तीव्र करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

