वीजपुरवठा खंडित, सिग्नल यंत्रणा बंद; हजारो नागरिक तासन्तास वाहतूक कोंडीत

वीजपुरवठा खंडित, सिग्नल यंत्रणा बंद; हजारो नागरिक तासन्तास वाहतूक कोंडीत

पावसाने उघड केला प्रशासनाचा बोजवारा; हडपसर ते लोणी महामार्ग ठप्प, सिग्नल बंद पडल्याने वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा

हडपसर : पहाटेपासून सुरू असलेल्या पावसाने आणि त्यानंतर खंडित झालेल्या वीजपुरवठ्याने हडपसर परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला. उड्डाणपूल, पुणे-सोलापूर महामार्ग, संपूर्ण हडपसर, गाडीतळ चौक, मांजरी फाटा, शेवाळेवाडी, मगरपट्टा चौक, वैदुवाडी चौक, रविदर्शन चौक आदी प्रमुख ठिकाणांवरील सर्व वाहतूक सिग्नल बंद पडल्याने लोणीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

आज सकाळी आठच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसानंतर वीजपुरवठा खंडित झाला. सकाळी दहानंतर पाऊस थांबला असला तरी वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने वाहतूक सिग्नल यंत्रणा बंदच राहिली. परिणामी शहरातील अत्यंत महत्त्वाच्या मार्गांवर वाहतुकीचा पूर्ण खोळंबा झाला.

वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक त्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात पोलिस कर्मचारी नसल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली. सिग्नल बंद असताना वाहतुकीचे नियोजन करण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र दिसून आले. प्रत्येक वाहनचालकाला पुढे जाण्याची घाई असल्याने चौकांमध्ये अक्षरशः अराजक माजले होते.

रस्त्यांवर ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली होती. अनेक खड्ड्यांमध्ये पाणी भरल्याने वाहनचालकांना मार्ग काढणे कठीण झाले. त्यामुळे वाहनांचा वेग मंदावला आणि कोंडीत आणखी भर पडली. चाकरमानी, कामगार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना वेळेत गंतव्यस्थानी पोहोचणे अशक्य झाले. अनेकांना कामावर जाण्यासाठी तासन्तास उशीर सहन करावा लागला.

नागरिकांनी अशा परिस्थितीत संयम बाळगून वाहतुकीचे नियम पाळणे अपेक्षित असते. मात्र ‘आधी मी’ या मानसिकतेतून अनेक वाहनचालकांनी चुकीच्या पद्धतीने वाहने घुसवल्याने कोंडी अधिकच बिकट झाली. प्रशासनाचे नियोजनशून्य कामकाज आणि नागरिकांची बेफिकीर वृत्ती यांचा फटका मात्र सर्वसामान्यांना बसला.

नागरिकांचा संतप्त सवाल

“दरवर्षी पावसाळ्यात हाच प्रकार घडतो. काही तासांच्या पावसाने जर संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडत असेल, तर प्रशासनाच्या आपत्कालीन यंत्रणा नेमक्या कशासाठी आहेत?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

तातडीने उपाययोजनांची गरज

वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर वाहतूक सिग्नल सुरू ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा, महत्त्वाच्या चौकांमध्ये तातडीने वाहतूक पोलिसांची नियुक्ती आणि पावसाळ्यापूर्वी रस्ते व जलनिस्सारण व्यवस्थेची प्रभावी दुरुस्ती करणे अत्यावश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. अन्यथा प्रत्येक पावसात पुणेकरांना अशाच वाहतूक नरकयातना सहन कराव्या लागणार आहेत.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!