ससाणे नगरचा मुख्य रस्ता बेकायदेशीर अतिक्रमणाच्या विळख्यात

ससाणे नगरचा मुख्य रस्ता बेकायदेशीर अतिक्रमणाच्या विळख्यात

विनापरवाना टेम्पो, हातगाड्यांमुळे वाहतुकीचा बोजवारा; काळेपडळ वाहतूक विभाग, अतिक्रमण विभाग आणि घनकचरा विभाग कारवाई कधी करणार?

हडपसर,

हडपसरमधील ससाणे नगर मुख्य रस्त्यावर विनापरवाना टेम्पो चालक आणि हातगाडेधारकांकडून भाजीपाला, फळे तसेच खाद्यपदार्थांची सर्रास विक्री सुरू असून, सार्वजनिक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली असून, स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि पादचाऱ्यांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणा कारवाई करत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ससाणे नगर परिसरात अनेक ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावरच टेम्पो उभे करून भाजीपाला व फळांची विक्री केली जात आहे. त्याचप्रमाणे हातगाड्यांवर खाद्यपदार्थांची विक्रीही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या अतिक्रमणामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली असून, सकाळ-सायंकाळ वाहतुकीची कोंडी नित्याची झाली आहे.

यातील अनेक विक्रेत्यांकडे पुणे महापालिकेचा व्यवसाय परवाना आहे का? तसेच खाद्यपदार्थ विकणाऱ्यांकडे एफएसएसएआय (FSSAI) चा वैध परवाना आहे का? याची तपासणी प्रशासनाकडून होत आहे का, असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.

अतिक्रमण करण्यात आलेली ठिकाणे

  • नवनाथ तरुण मंडळ चौक
  • काळे कॉलनी एसबीआय बँक चौक
  • साईबाबा मंदिर परिसर
  • रेल्वे गेट परिसर
  • दोन्ही भुयारी मार्ग
  • प्रतिभा रेसिडेन्सीसमोरील मुख्य रस्ता
  • संपूर्ण ससाणे नगर मुख्य रस्ता

या सर्व ठिकाणी रस्त्यावर अतिक्रमण करून टेम्पो व हातगाड्यांवर व्यवसाय सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

कारवाई करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची?

वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची जबाबदारी काळेपडळ वाहतूक विभागाची आहे. रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी पुणे महापालिकेच्या हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाची आहे. परिसरात कचरा व अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी घनकचरा व्यवस्थापन विभागाची असून, खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे आवश्यक परवाने आहेत की नाहीत, याची तपासणी संबंधित अन्न सुरक्षा विभागाने करणे अपेक्षित आहे.

नागरिकांना त्रास

बेकायदेशीर अतिक्रमणामुळे वाहनांच्या रांगा लागत असून, शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि रुग्णवाहिकांनाही मार्ग काढताना अडचणी येत आहेत. विक्रीनंतर रस्त्यावर टाकण्यात येणारा कचरा, सडलेला भाजीपाला आणि इतर घाणीमुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, सार्वजनिक आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. अपघाताचा धोका वाढल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

ससाणे नगर मुख्य रस्ता हा परिसरातील प्रमुख दळणवळणाचा मार्ग असूनही तो बेकायदेशीर अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला आहे. काळेपडळ वाहतूक विभाग, हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाचा अतिक्रमण विभाग आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग संयुक्त मोहीम राबवून हे अतिक्रमण हटविणार की एखाद्या गंभीर अपघाताची वाट पाहणार? असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, तातडीने कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाईची मागणी जोर धरत आहे.

हडपसर मांजरी क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत अतिक्रमण निरीक्षक साईनाथ निकम यांच्या शी संपर्क केला असता ते म्हणाले की ससाणे नगर रस्त्यावरील अतिक्रमण बाबत सातत्याने कारवाई होत असते. तरी देखील नागरिकांच्या तक्रारीची तत्काळ दखल घेतली जाईल.सदर ठिकाणी कारवाई करण्यात येईल

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!