बेकायदा उत्खननातून शासनाचा ₹९ कोटी महसूल बुडवल्याचा आरोप

बेकायदा उत्खननातून शासनाचा ₹९ कोटी महसूल बुडवल्याचा आरोप

पुणे : मौजे रासकवाडी, पुनावळे, ता. मुळशी येथील सर्व्हे नं. ४३ मधील उत्खनन प्रकरणावरून मुळशी तहसीलदार विजयकुमार चोबे यांच्या भूमिकेबाबत तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी तातडीने निलंबन करण्याची मागणी करण्यात आली असून, उपविभागीय अधिकारी, मावळ-मुळशी उपविभाग, पुणे यांनी तहसीलदार मुळशी यांना संबंधित तक्रारीच्या अनुषंगाने खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

तक्रारीनुसार, ट्युलिप इन्फ्रा कंपनीचे संजय हरिप्रसाद वर्मा यांनी सर्व्हे नं. ४३ येथे एक हजार ब्रास उत्खननाची परवानगी घेतली होती. मात्र, दहा हजार ब्रासपेक्षा अधिक उत्खनन केल्याचा तसेच अतिरिक्त बेकायदेशीर उत्खनन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या अतिरिक्त उत्खननाबाबत संबंधित बिल्डरवर दंडात्मक कारवाई करण्यात आली नसल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.

या प्रकारामुळे शासनाचा सुमारे नऊ कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून तहसीलदार विजयकुमार चोबे यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्याची मागणी प्रा. नामदेवराव जाधव, राष्ट्रीय पक्षप्रमुख, सनय छत्रपती शासन यांच्याकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, १५ सप्टेंबर २०२६ रोजीचे प्रा. नामदेवराव जाधव यांचे पत्र उपविभागीय अधिकारी कार्यालयास प्राप्त झाले आहे. या पत्राची मूळ प्रत जोडून, त्यातील मुद्दा क्रमांक १ ते ५ मधील आरोपांच्या अनुषंगाने आवश्यक पुरावे व कागदपत्रांसह खुलासा कार्यालयास सादर करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी सुरेंद्र सोपन नाळे यांनी तहसीलदार मुळशी यांना दिले आहेत. या कामात विलंब होऊ नये, अशीही सूचना पत्रातून करण्यात आली आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!