मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच नियमांची पायमल्ली; आकाशचिन्ह विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
पुणे : महंमदवाडी परिसरातील दोराबजी मॉल मागील पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते रविवारी मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री Sunetra Pawar, केंद्रीय मंत्री Murlidhar Mohol, पुणे महापालिका आयुक्त Ram Kishor Nawal, विधान परिषदेचे आमदार Yogesh Tilekar यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.
“पुणे स्मार्ट बनविण्याचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी विकासकामांना गती देण्यात येत आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. मात्र कार्यक्रमस्थळ परिसरातच मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर होर्डिंग्ज आणि फ्लेक्स झळकत असल्याने प्रशासनाच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पुणे महापालिकेने अलीकडेच शहरातील अधिकृत होर्डिंग्जवर QR स्कॅनर कोड अनिवार्य करणारे धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार परवानगी नसलेल्या होर्डिंग्जवर तत्काळ कारवाई अपेक्षित असताना महंमदवाडी, दोराबजी मॉल चौक आणि रहेजा चौक परिसरात विनापरवाना फ्लेक्स उघडपणे लावण्यात आल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमादरम्यानही या अनधिकृत होर्डिंग्जकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे पुणे महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, काही दिवसांत पावसाळा सुरू होणार असून मोठ्या आकाराचे फ्लेक्स आणि लोखंडी होर्डिंग्ज धोकादायक स्थितीत असल्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी राज्यात होर्डिंग दुर्घटनांमध्ये जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या असतानाही प्रतिबंधात्मक कारवाई होत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
“स्मार्ट सिटीच्या घोषणा एका बाजूला आणि प्रत्यक्षात नियमांचे उघड उल्लंघन दुसऱ्या बाजूला,” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत असून, “नियम केवळ सर्वसामान्यांसाठीच आहेत का?” असा सवालही उपस्थित केला जात आहे.
