
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील उद्यानांच्या वेळेत वाढ
पुणे,
पुणे महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील कलम ६६(१०) अन्वये सार्वजनिक उद्याने, बागा व मनोरंजनासाठी मोकळ्या जागांची तरतूद करणे तसेच नागरिकांना विरंगुळ्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही महानगरपालिकेची महत्त्वाची जबाबदारी आहे. या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत शहरातील नागरिकांसाठी विविध सार्वजनिक उद्यानांचा विकास व देखभाल करण्यात येत आहे.
पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये उद्यान विभागामार्फत एकूण २१६ उद्याने विकसित करण्यात आली आहेत. या उद्यानांमध्ये पुणेकर नागरिक, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच देश-विदेशातून पुण्यात येणारे पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात.
कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून नागरिकांना उद्यानांचा अधिक वेळ आनंद घेता यावा, यासाठी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील उद्यानांच्या वेळेत विशेष वाढ करण्यात येत आहे.
त्यानुसार, रविवार, दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त उद्याने सकाळी ६.०० ते ११.०० वाजेपर्यंत आणि सायंकाळी ४.०० ते रात्री १२.०० वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुली ठेवण्यात येणार आहेत.
या विशेष सुविधेमुळे पुणेकरांना कुटुंबीयांसह उद्यानांमध्ये फेरफटका मारता येईल, निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवता येईल आणि चांदण्यांच्या प्रकाशात कोजागिरी पौर्णिमेचा आनंद घेता येईल.पुणेकर नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत करण्यात येत आहे.

