
विषारी दारूमुळे पुणे-पिंपरी चिंचवड हादरले; १३ जणांचा मृत्यू
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी स्पिरिटयुक्त दारू प्रकरणाने खळबळ उडाली असून आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर अनेक जण गंभीर अवस्थेत विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. या घटनेमुळे हडपसर, काळेपडळ, दापोडी आणि फुगेवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील दापोडी व फुगेवाडी भागात आठ जणांचा मृत्यू झाला असून पुण्यातील काळेपडळ येथे तीन तर हडपसर भागात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. विषारी दारू प्रकरणात योगेश वानखेडे याचे नाव समोर आले असून त्याने स्पिरिटयुक्त दारू तयार करून पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या विविध भागांत विक्री केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती मिळत आहे.
हडपसर परिसरातील मृतांची नावे पुढीलप्रमाणे असल्याची माहिती समोर आली आहे :
राहुल शरद क्षीरसागर (वय ४५, रा. पांढरे मळा, सर्वे नं. २५७, हडपसर)
विजय भू कुरलाल शर्मा (वय ४५, रा. पांढरे मळा, ससाणेनगर, हडपसर)
अरुण डाडर (रा. हडपसर)
अशोक रमेश चव्हाण (रा. काळेपडळ)
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल शरद क्षीरसागर हा कथित बेकायदेशीर विनापरवाना दारू विक्री ठिकाणी काम करत होता. त्याला दारूचे व्यसन असल्याचीही चर्चा परिसरात आहे.
दरम्यान, पांढरे मळा परिसरात कथितपणे बेकायदेशीर दारू विक्री करणारा हणमा जाधव उर्फ “डुक्करवाले” याच्यावर अद्याप कारवाई झालेली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तसेच हडपसर पोलिसांकडून माहिती देण्यास टाळाटाळ होत असून अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून विषारी दारू नेमकी कुठून आणली गेली, किती ठिकाणी विक्री झाली आणि यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे याचा शोध घेतला जात आहे.

