
विसर्जनादरम्यान महिला पोलिसावर हल्ला, तिघांवर गुन्हा
हडपसर, ससाणेनगर येथील हिंगणे मळा विसर्जन घाटावर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या महिला पोलीस अंमलदारावर नारळ फेकून हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात महिला अंमलदाराचा दात पडला असून दोन दात हलले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्योती प्रदीप सोनवणे (वय ३६, ब.नं. २३७०) या २५ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास कॅनाललगत कर्तव्य बजावत होत्या. त्यावेळी गर्दीतून आरोपी जितेनसिंग टाक (२३), चिंटूसिंग टाक (२५) आणि राजवीर भोंड (२६, तिघे रा. वानवडी) यांनी दगडफेक केली आणि जोरात नारळ फेकला. हा नारळ सोनवणे यांच्या तोंडावर लागला.
याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११७(२), ३(५) अन्वये गु.र.नं. ४७५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पुढील तपास सहायक निरीक्षक प्रवीण अब्दागिरे करीत आहेत.

