पॉक्सो तपासात हलगर्जीपणा भोवला! फुरसुंगीच्या महिला PSI कोमल जाधव निलंबित

पॉक्सो तपासात हलगर्जीपणा भोवला! फुरसुंगीच्या महिला PSI कोमल जाधव निलंबित

फुरसुंगी

पोक्सोसारख्या संवेदनशील गुन्ह्याच्या तपासात गंभीर निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवल्याने फुरसुंगी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक कोमल करभू जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे. आरोपीच्या अटकेबाबत दुर्लक्ष, अटकपूर्व जामीन सुनावणीवेळी न्यायालयात त्रोटक अहवाल सादर करणे आणि महत्त्वाच्या सुनावणीला अनुपस्थित राहणे, या त्रुटींमुळे प्रकरणाने गंभीर वळण घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पोक्सो गुन्ह्याच्या तपासातील या त्रुटींवर उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाच्या ताशेऱ्यांनंतर पोलीस प्रशासनाने कारवाई करत जाधव यांना निलंबित केले आहे.

पोक्सोसारख्या गंभीर प्रकरणाच्या तपासातच हलगर्जीपणा होत असेल, तर पीडितेला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी कोण पार पाडणार? असा सवाल या घटनेमुळे उपस्थित होत आहे.

दरम्यान, या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्यात येणार असून, तपासातील त्रुटींची व्याप्ती आणि संबंधित जबाबदारी निश्चित होणे महत्त्वाचे ठरणार आहे. आता या चौकशीतून नेमके काय समोर येते आणि पुढे कोणती कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!