
मुंढेंच्या बदलीसाठी 250 कोटी गोळा केल्याचा आव्हाडांचा गंभीर आरोप……
मुंबई , राज्यातील अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या कारभारावर विधानसभेत जोरदार चर्चा रंगली. या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कामाचे कौतुक करताना अत्यंत गंभीर आरोप केले. मुंढे यांच्या कारवाईमुळे अडचणीत आलेल्या काही लॉबींनी त्यांच्या बदलीसाठी तब्बल 250 कोटी रुपये गोळा केल्याचा दावा आव्हाड यांनी सभागृहात केला.
सभागृहात बोलताना आव्हाड म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या अन्न भेसळ, निकृष्ट दर्जाची औषधे आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर FDA विभागाला राज्याच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आणण्याचे श्रेय तुकाराम मुंढे यांना जाते. ते म्हणाले, “महाराष्ट्राला कॅन्सरच्या विळख्यात ढकलणाऱ्या आणि लोकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या घटकांविरोधात कठोर कारवाई करणारा अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे पुढे आले आहेत. त्यामुळे त्यांचे अभिनंदन केले पाहिजे.”
“मुंढेंच्या बदलीसाठी 250 कोटींची लॉबी सक्रिय”यावेळी आव्हाडांनी सर्वात मोठा आरोप करत सांगितले की, FDA च्या कारवायांमुळे अनेक औषध कंपन्या आणि संबंधित हितसंबंधी गट अडचणीत आले आहेत.
“मुंढेंनी अनेक ड्रग कंपन्यांना कामाला लावलं आहे. त्यामुळे त्यांच्या बदलीसाठी इंटरनॅशनल ड्रग लॉबी सक्रिय झाली आहे. फक्त तुकाराम मुंढेंची बदली व्हावी यासाठी 250 कोटी रुपये जमा करण्यात आल्याची माहिती माझ्याकडे आहे,” असा दावा त्यांनी केला.आव्हाडांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात एकच खळबळ उडाली.राज्यात तांदूळ, दूध, मावा आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचा मुद्दाही आव्हाड यांनी उपस्थित केला. भेसळीच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी आवश्यक त्या प्रयोगशाळाच उपलब्ध नसल्याची टीका त्यांनी केली.
“क्वालिटी अॅनालिसिस करण्यासाठी पुरेशा लॅब नाहीत. एवढ्या मोठ्या राज्यात भेसळीविरोधात प्रभावी कारवाई करायची असेल तर प्रयोगशाळांचे जाळे मजबूत करावे लागेल,” असे ते म्हणाले.”अधिकारी सेटलमेंटसाठी दबाव आणतात”FDA विभागातील काही अधिकाऱ्यांवरही आव्हाड यांनी गंभीर आरोप केले. काही अधिकारी संबंधित उद्योगांकडून ‘सेटलमेंट’ करण्यासाठी दबाव आणतात, असा आरोप त्यांनी केला.”अधिकारी पैसे घेऊन सेटलमेंट करा असे सांगतात. लॅब रिपोर्ट फेल दाखवला जातो आणि प्रकरण मिटवले जाते. हा प्रकार थांबवला पाहिजे,” असे आव्हाड म्हणाले.
राज्यातील प्रयोगशाळा उभारणीबाबत सरकारला प्रश्न विचारताना त्यांनी पुणे, नाशिक, नागपूरसह इतर भागांतील लॅबचे काम कधी पूर्ण होणार, नव्या लॅब कुठे सुरू होणार आणि जुन्या यंत्रसामग्रीच्या आधुनिकीकरणाची जबाबदारी कोण घेणार, याबाबत स्पष्टीकरण मागितले.
यावर उत्तर देताना संबंधित मंत्र्यांनी पुणे, नाशिक आणि नागपूर येथील कामे प्रगतिपथावर असून ती पुढील काही महिन्यांत पूर्ण होतील, असे सांगितले. तसेच यवतमाळ आणि रायगड-पेण येथेही प्रयोगशाळांसाठी आवश्यक जागा उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली.
चर्चेदरम्यान तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या चर्चेलाही ऊत आला. त्यावर सत्ताधारी बाकांमधूनही “मुंढे साहेबांची बदली होणार नाही” अशी भूमिका मांडण्यात आली. यामुळे FDA मधील सुरू असलेल्या कारवायांना सरकारचा पाठिंबा असल्याचे संकेत मिळाले.
आव्हाड यांनी FDA मधील काही अधिकाऱ्यांची नावे घेत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. काही अधिकाऱ्यांनी नमुने बदलण्याचा उद्योग केल्याचा आरोप करत त्यांच्या कार्यकाळाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (ACB) चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विनापरवाना मांसविक्री सुरू असल्याचाही मुद्दा आव्हाड यांनी उपस्थित केला. “आरोग्य विभाग आणि FDA यांनी संयुक्त कारवाई करून अशा दुकानांवर बंदी घालावी,” अशी मागणी त्यांनी केली.
राज्यात अन्न भेसळ, औषधांची गुणवत्ता, प्रयोगशाळांची कमतरता, भ्रष्टाचाराचे आरोप आणि FDA च्या कारवाईमुळे निर्माण झालेला दबाव या सर्व मुद्द्यांवर सभागृहात सविस्तर चर्चा झाली. विशेषतः तुकाराम मुंढे यांच्या कामकाजाचे समर्थन करत त्यांच्या बदलीसाठी 250 कोटी रुपयांची लॉबी सक्रिय असल्याचा जितेंद्र आव्हाड यांनी केलेला दावा हा या चर्चेचा सर्वात चर्चेचा मुद्दा ठरला.
मात्र, आव्हाड यांच्या या आरोपांबाबत सरकारकडून किंवा संबंधित संस्थांकडून कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. त्यामुळे या दाव्यांची सत्यता पुढील काळात स्पष्ट होणार आहे.

