हडपसरची वाहतूक कोंडी ‘नित्याची’च; विकास आराखड्यातील रस्ते ३८ वर्षे रखडल्याने नागरिक हैराण

हडपसरची वाहतूक कोंडी ‘नित्याची’च; विकास आराखड्यातील रस्ते ३८ वर्षे रखडल्याने नागरिक हैराण

मगरपट्टा, गाडीतळ, गांधी चौक, उड्डाणपुलांवर सकाळपासून वाहनांच्या रांगा; अतिक्रमण, अपुरे नियोजन आणि रखडलेले रस्ते ठरताहेत कोंडीचे प्रमुख कारण

पुणे :

हडपसर परिसरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर होत असून, गुरुवारी सकाळी १० वाजल्यापासून मगरपट्टा चौक, गाडीतळ चौक, गांधी चौक, रामटेकडी उड्डाणपूल, मगरपट्टा उड्डाणपूल आणि हडपसर उड्डाणपूल परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे नोकरदार, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णवाहिकांनाही तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले.

नागरिकांच्या मते, अवघ्या तीन किलोमीटरच्या परिसरात तीन उड्डाणपूल उभारण्यात आले असले तरी प्रभावी वाहतूक नियोजनाच्या अभावामुळे त्याचा अपेक्षित फायदा होत नाही. उलट प्रमुख चौकांमधील कोंडी दिवसेंदिवस वाढत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

विकास आराखड्यातील रस्ते अद्याप अपूर्ण

हडपसरच्या वाहतूक कोंडीमागे विकास आराखड्यातील रखडलेले रस्ते हे प्रमुख कारण असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. १९८७ साली सादर झालेल्या आणि १९९८ मध्ये मंजूर झालेल्या विकास आराखड्यात ३०, २४, १८ आणि १२ मीटर रुंदीचे अनेक रस्ते प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र अनेक वर्षे उलटूनही हे रस्ते पूर्णत्वास आलेले नाहीत. त्यामुळे वाढत्या वाहनसंख्येचा ताण जुन्या रस्त्यांवर पडत असून वाहतूक कोंडीची समस्या अधिकच तीव्र झाली आहे.

राजकीय इच्छाशक्तीवर प्रश्नचिन्ह

महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते अशी महत्त्वाची पदे हडपसरच्या लोकप्रतिनिधींना मिळाली. मात्र विकास आराखड्यातील रस्ते विकसित झाले नाहीत. त्यामुळे इतकी राजकीय ताकद मिळूनही हडपसरचा विकास का झाला नाही, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा

उड्डाणपुलांच्या खाली, सोलापूर रस्त्यावर आणि प्रमुख चौकांमध्ये विनापरवाना व्यवसाय वाढल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. मंत्री मार्केटसमोरील बेकायदेशीर कांदा-बटाटा विक्रीसह अन्य अतिक्रमणांवर कारवाई का होत नाही, असा सवाल हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाला करण्यात आला आहे.

नागरिक काय म्हणाले?

मनिषा राऊत : “चार उड्डाणपूल असूनही कोंडी कायम आहे. वाहतूक नियोजनात समन्वयाचा अभाव स्पष्ट दिसतो.”

प्रतीक गवळी : “वाहतूक विभागाचे काम केवळ दंडात्मक कारवाई करणे नाही. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रभावी नियोजनाची गरज आहे.”

भूषण बिराजदार : “उड्डाणपुलाखालील आणि सोलापूर रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. अतिक्रमण विभागाने तातडीने कारवाई करावी.”

नागरिकांची मागणी

हडपसरमधील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी कमी करण्यासाठी विकास आराखड्यातील रखडलेले रस्ते तातडीने विकसित करणे, प्रमुख चौकांचे वैज्ञानिक वाहतूक नियोजन करणे आणि रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी सातत्यपूर्ण मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!