
स्कॉर्पिओची कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक; मोहोळच्या तरुणाचा मृत्यू
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सापटणे (ता. माढा) गावाच्या हद्दीत एच.पी. पेट्रोल पंपाजवळ सोमवारी (दि. २१) दुपारी महिंद्रा स्कॉर्पिओने कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात स्कॉर्पिओमधील तिघे तरुण गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान कर्ण महेश पवार (वय २३, रा. मोहोळ) याचा मृत्यू झाला. अनिकेत लक्ष्मण धोत्रे (वय २३) आणि रोहित विजय मोरे (वय २१) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
महिंद्रा स्कॉर्पिओ (एमएच ४२ बीएन ५११२) मोहोळहून टेंभुर्णीकडे जात होती. सापटणे हद्दीत एच.पी. पेट्रोल पंपाजवळ पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर (टीएस ०८ यूबी ४४७८) ला स्कॉर्पिओने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर स्कॉर्पिओचा पुढील भाग कंटेनरखाली अडकला. त्यामुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले आणि तिघे तरुण वाहनात अडकले.
अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोलनाका गस्ती पथक तसेच मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या साहाय्याने स्कॉर्पिओ कंटेनरखालून बाहेर काढण्यात आली. त्यानंतर वाहनाचे दरवाजे तोडून तिघा जखमींना बाहेर काढण्यात आले.
जखमींना टेंभुर्णी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातात तिघांच्या डोक्याला, छातीला, हात-पाय तसेच पोटाला गंभीर दुखापत झाली होती.

