
विकासकामांच्या टेंडरला गती देण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश
पुणे : पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त प्रजित नायर यांनी शहरातील सर्व परिमंडळ व क्षेत्रीय कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेतला. विकासकामांची प्रगती, नागरी समस्या आणि क्षेत्रीय स्तरावरील कामांच्या सद्यस्थितीबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
विकासकामांची निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून प्रत्यक्ष कामांना लवकर सुरुवात करावी, अशा सूचना नायर यांनी दिल्या. क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील क्रॉनिक स्पॉट तातडीने दूर करून त्यावर सातत्याने लक्ष ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले.
क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सुरू असलेल्या कामांची दररोज पाहणी करून कामांची गुणवत्ता आणि प्रगती तपासावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. शहरातील रस्ते दुरुस्तीच्या कामांना प्राधान्य देऊन नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देण्यावर भर देण्याच्या सूचना करण्यात आल्या.
वॉर्ड स्तरावर उपलब्ध निधीचा योग्य व नियोजनबद्ध वापर करून नागरिकांच्या गरजेनुसार आवश्यक कामांना प्राधान्य द्यावे, असे निर्देशही बैठकीत देण्यात आले.
बैठकीस उपायुक्त अविनाश सपकाळ, अरविंद माळी, विजयकुमार थोरात, आशा राऊत यांच्यासह सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त, संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

