
हडपसर गाडीतळ बसस्थानकात पीएमपी बसखाली चिरडून ७९ वर्षीय वृद्धेचा मृत्यू
भरधाव बसची धडक; चालकाविरोधात गुन्हा दाखल, दहा दिवसांतील दुसऱ्या गंभीर अपघाताने पीएमपीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
हडपसर : हडपसर गाडीतळ बसस्थानकाच्या आवारात पीएमपी बसने दिलेल्या धडकेत ७९ वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि. २९) सकाळी पावणेबाराच्या सुमारास घडली. कमलाबाई दादू लोढे (वय ७९, रा. कॅम्प, पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे बसस्थानकाच्या आवारातील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा तसेच पीएमपीएमएल प्रशासनाच्या कारभाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कमलाबाई लोढे या गुरुवारी सकाळी हडपसर गाडीतळ बसस्थानकाच्या आवारात उभ्या होत्या. त्याचवेळी हिंजवडीहून भेकराईनगरकडे जाणारी पीएमपी बस भरधाव वेगात आली. बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बसची जोरदार धडक कमलाबाईंना बसली. त्या बसखाली अडकल्या. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत त्यांना बसखालून बाहेर काढले आणि तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर दुखापतीमुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
याप्रकरणी मृत महिलेचे पुत्र सुरेंद्र लोढे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बसचालक तुषार देविदास कामठे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिली.
दहा दिवसांत दुसरा गंभीर अपघात; पीएमपीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर!
हडपसर परिसरात पीएमपी बसच्या अपघातांची मालिका सुरूच असल्याचे चित्र आहे. अवघ्या दहा दिवसांपूर्वी गाडीतळ-सासवड रस्त्यावरील ग्लायडिंग सेंटरच्या प्रवेशद्वारासमोर पीएमपी बसने दुचाकीस्वार तरुणीला पाठीमागून धडक दिली होती. या अपघातात तरुणीचा पाय गंभीर जखमी झाल्याने तिला पाय गमवावा लागला. विशेष म्हणजे, ही तरुणी पोलीस भरतीची तयारी करीत होती. या अपघातामुळे तिचे पोलीस दलात जाण्याचे स्वप्नच भंगले आहे.
एकापाठोपाठ घडणाऱ्या या दुर्घटनांमुळे पीएमपी बसचालकांच्या वाहन चालविण्याच्या पद्धतीवर आणि प्रशासनाच्या नियंत्रणावर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बसचालकांच्या निष्काळजीपणाला जबाबदार कोण, बसस्थानकाच्या आवारात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पुरेशा उपाययोजना का नाहीत, तसेच अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासन ठोस कारवाई कधी करणार, असे सवाल उपस्थित होत आहेत.
‘आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?’
या घटनेवर शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार? वारंवार दुर्घटना घडत असताना पीएमपीएमएल प्रशासन नेमके काय करते? खासगी कंत्राटदारांच्या बसचालकांवर प्रशासनाचा अंकुश आहे की नाही? नागरिकांचे जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?”
हडपसर परिसरात वारंवार पीएमपी बसचे अपघात होत असताना प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होणार का, असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करीत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

