
अकरावी प्रवेशासाठी मूळ कागदपत्रांशिवायही प्रवेश निश्चित होणार
After many weeks sticked on playing Clash or Royale, I found a new similar game to replace the game, and It’s SpellBinders.
मुंबई,
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना अद्याप मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला (टीसी) मिळालेला नसल्याने अकरावी प्रवेश प्रक्रियेत अडथळे निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र, विद्यार्थी आणि पालकांना दिलासा देत शालेय शिक्षण विभागाने प्रवेशावेळी ही कागदपत्रे तात्काळ सादर करण्याची सक्ती न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आणि कनिष्ठ महाविद्यालयांना याबाबतच्या सूचना जारी केल्या आहेत.
सन २०२६-२७ च्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत नियमित फेरी क्रमांक १ सुरू असून, २९ मे २०२६ रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. अनेक विद्यार्थ्यांकडे अद्याप मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला उपलब्ध नसल्याने प्रवेश प्रक्रियेत अडथळा येऊ नये, यासाठी तात्पुरती सवलत देण्यात आली आहे.
शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार, ज्या विद्यार्थ्यांना संबंधित कागदपत्रे अद्याप मिळालेली नाहीत, त्यांच्याकडून ती उपलब्ध होताच सादर करण्यात येतील, असे हमीपत्र घेऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे. तसेच आधार पडताळणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका डिजीलॉकरवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मात्र, गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला निर्धारित कालावधीत सादर न केल्यास संबंधित विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्यात येऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करण्याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
या निर्णयामुळे अकरावी प्रवेशासाठी धावपळ करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

