
नागरिकांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ; पालिकेची जबाबदारी नेमकी कुठे?
पुणे : शहरात दूषित व गढूळ पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी होत असताना, त्यावर ठोस उपाययोजना करण्याऐवजी पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांनाच “तुरटी फिरवा, पाणी गाळा आणि उकळून प्या” असा सल्ला देत स्वतःची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे.
शुद्ध पाणी पुरवणे ही महापालिकेची कायदेशीर जबाबदारी; ती नागरिकांवर ढकलण्याचा प्रयत्न.
पावसामुळे पाणी गढूळ होत असेल, तर त्यावर उपाययोजना करणे हे जलशुद्धीकरण यंत्रणेचे काम; नागरिकांनी तुरटी वापरण्याची वेळ का यावी?
नागरिक कर भरतात शुद्ध पाण्यासाठी, घरात पाणी शुद्ध करण्यासाठी नव्हे.
‘पाण्यात रोगजंतू नाहीत’ असा दावा आणि दुसरीकडे पाणी गाळून, उकळून पिण्याचे आवाहन; पालिकेची भूमिका परस्परविरोधी.
दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाल्यास त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार?
नागरिकांचा संतप्त सवाल
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटमधून जलशुद्धीकरण केंद्रांवर गढूळ पाण्याचा ताण वाढल्याची कबुली दिली आहे. मात्र, ही समस्या दूर करण्याऐवजी नागरिकांनाच अतिरिक्त काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे “पालिकेची जबाबदारी नागरिकांवर ढकलली जात आहे का?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
करांच्या पैशातून उभारलेल्या यंत्रणा असूनही नागरिकांना शुद्ध पाणी मिळत नसेल, तर ही केवळ प्रशासकीय निष्काळजीपणा नसून नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला गंभीर आणि जीवघेणा खेळ आहे. अशा परिस्थितीत केवळ आवाहने करून चालणार नाही, तर दूषित पाणीपुरवठा रोखण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करून सुरक्षित पाणीपुरवठा करणे हीच महापालिकेची प्राथमिक जबाबदारी असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

