आवाजाच्या दहशती विरोधात पुणेकर रस्त्यावर

आवाजाच्या दहशती विरोधात पुणेकर रस्त्यावर

पुणे : डीजे आणि लाऊडस्पीकरच्या वाढत्या आवाजाविरोधात पुणेकरांनी रविवारी रस्त्यावर उतरून प्रशासनाचे लक्ष वेधले. बालगंधर्व रंगमंदिर ते पुणे महापालिका असा काढण्यात आलेला मोर्चा शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. ज्येष्ठ नागरिक, तरुण, महिला तसेच राजकीय आणि अ-राजकीय घटकांचा उत्स्फूर्त सहभाग हे मोर्चाचे वैशिष्ट्य ठरले.

‘उत्सवांना विरोध नाही; मात्र उत्सवाच्या नावाखाली ध्वनिप्रदूषण सहन केले जाणार नाही,’ अशी स्पष्ट भूमिका आयोजकांनी मांडली. ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची प्रभावी आणि समान पद्धतीने अंमलबजावणी करावी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि नागरिकांच्या शांततेच्या अधिकाराचे संरक्षण करावे, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

“ध्वनिप्रदूषण हा केवळ आवाजाचा प्रश्न नसून विद्यार्थ्यांचे शिक्षण, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न आहे. कोणत्याही सण, धर्म किंवा परंपरेविरोधात हे आंदोलन नाही. मात्र, नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत,” असे आयोजकांनी स्पष्ट केले.

आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, ध्वनिप्रदूषणाच्या नोंदी करण्यासाठी सुरू केलेल्या उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ५९ ठिकाणांहून आवाजाच्या नोंदी करण्यात आल्या असून, त्यापैकी ३३ ठिकाणी १०० डेसिबलपेक्षा अधिक आवाजाची नोंद झाल्याचा दावा करण्यात आला. या नोंदींची अधिकृत यंत्रणेकडून पडताळणी होणे आवश्यक आहे.

‘आजचा मोर्चा ही सुरुवात’

“आजचा मोर्चा हा केवळ शक्तिप्रदर्शनासाठी नव्हता, तर पुणेकरांच्या भावनांचा प्रशासनापर्यंत पोहोचविलेला स्पष्ट संदेश आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने आणि शांततेत रस्त्यावर उतरून आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे प्रशासनाने आता केवळ आश्वासनांपुरते न थांबता नियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी,” अशी भूमिका आयोजकांनी मांडली.

ध्वनिप्रदूषणाविरोधातील जनजागृती पुढेही सुरू ठेवण्यात येणार असून, नागरिकांनी ध्वनिप्रदूषणाच्या घटनांची नोंद करून त्या प्रशासनाच्या निदर्शनास आणाव्यात, असे आवाहनही करण्यात आले. “दबावाला बळी न पडता लोकशाही आणि कायदेशीर मार्गाने हा पाठपुरावा सुरू राहील. नागरिकांच्या शांततेच्या अधिकाराशी तडजोड केली जाणार नाही,” असे आयोजकांनी सांगितले.

या आंदोलनात ८८ वर्षांच्या आजींचाही सहभाग होता. ज्येष्ठांपासून जनरेशन झेडमधील तरुणांपर्यंत विविध वयोगटातील नागरिकांनी एकत्र येत ध्वनिप्रदूषणाच्या प्रश्नावर आपली भूमिका मांडली. पुण्याच्या प्रथम नागरिकांनीही आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे आयोजकांनी सांगितले.

“पुणेकरांनी आज शांततापूर्ण आणि सुसंस्कृत पद्धतीने एकजूट दाखविली आहे. कोणत्याही घटकाशी संघर्ष हा या आंदोलनाचा उद्देश नसून, नियमांची प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकांना शांततेत जगण्याचा अधिकार मिळणे हेच अंतिम ध्येय आहे,” असे आयोजकांनी स्पष्ट केले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!