
पर्यावरण स्थिती अहवाल सादर; कचरा व्यवस्थापनावर विशेष भर
पुणे,
पुणे महापालिकेने २०२५-२६ या वर्षासाठीचा पहिला पर्यावरण स्थिती अहवाल (Environmental Status Report) सादर केला असून, शहरातील पाणीपुरवठा, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, हवेची गुणवत्ता, वाहतूक आणि हवामान बदलासंदर्भातील उपाययोजनांचा सविस्तर आढावा यात मांडण्यात आला आहे.
अहवालानुसार, शहरातील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता राष्ट्रीय निकषांनुसार कायम ठेवण्यात यश आले असून, सांडपाणी प्रक्रिया क्षमतेत वाढ करण्यासाठी नवीन प्रकल्प उभारले जात आहेत. कचरा व्यवस्थापनात स्त्रोतावर कचरा वर्गीकरणाला प्राधान्य देत पुनर्वापर आणि प्रक्रिया वाढविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
हवेच्या गुणवत्तेबाबत पीएम २.५ आणि नायट्रोजन डायऑक्साइड (NO₂) पातळीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, प्रदूषण नियंत्रणासाठी हरित क्षेत्र वाढविणे, सार्वजनिक वाहतूक आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात आला आहे. गेल्या वर्षात ई-वाहनांच्या नोंदणीत वाढ झाल्याचेही अहवालात नमूद आहे.
हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच स्वतंत्र प्रकरणाचा समावेश करण्यात आला असून, उष्णतेच्या लाटा, पूरस्थिती आणि नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी शहराची तयारी अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. या अहवालासाठी सुमारे ९,६०० नागरिकांचा सहभाग नोंदविण्यात आला.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले की, हा अहवाल केवळ औपचारिक दस्तऐवज नसून, पुण्याच्या शाश्वत आणि पर्यावरणपूरक विकासाचा मार्गदर्शक ठरणार आहे. नागरिकांचा सहभाग आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे भविष्यातील पर्यावरणीय नियोजन अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

