जीवे मारण्याची धमकी देत २० लाखांच्या खंडणीची मागणी

जीवे मारण्याची धमकी देत २० लाखांच्या खंडणीची मागणी

पुणे ,

जीवे मारण्याची तसेच बांधकाम पाडण्याची धमकी देत तब्बल २० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या चौघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून रंगेहात अटक केली. आरोपींकडून रोख रक्कम, मोबाईल फोन व वाहनांसह सुमारे ७ लाख ९ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी हजराप्पा शाळेजवळ, मांगडेवाडी (कात्रज, पुणे) येथे ममता फाउंडेशन संस्थेच्या वसतिगृहासाठी इमारत बांधकाम केले होते. या कामामुळे संस्थेचे संचालक विनोद गायकवाड यांनी पुणे महापालिकेत तक्रार करून बांधकाम पाडण्याची भीती दाखवली. त्यानंतर “महापालिकेत तक्रार करू नये, अन्यथा २० लाख रुपये द्यावे लागतील,” अशी धमकी देत खंडणीची मागणी करण्यात आली.

दरम्यान, फिर्यादींकडून टायर कंपनीचे घटक व गुगल पेद्वारे २० हजार रुपये, तसेच रोख ४,५०० रुपये आरोपींनी घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर फिर्यादी यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०८ (२), ३०८ (३), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान आरोपींनी खंडणीपैकी ५० हजार रुपये कात्रज येथील किनारा हॉटेलमध्ये स्वीकारण्याचे ठरवले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून आरोपींना रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले.

अटक आरोपी : विनोद निवृत्ती गायकवाड (वय ४३), संग्राम दत्तात्रय सोनवणे (वय ३०), सुधीर मधु रेडे (वय ३८), निलेश बाबन कुंभार (वय ४२)

या कारवाईत आरोपींकडून ७,०९,८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते करीत आहेत.

ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ-५, सहायक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही व्यक्तीकडून धमकी देऊन खंडणीची मागणी होत असल्यास किंवा अशा प्रकारच्या गुन्ह्यांची माहिती असल्यास तात्काळ पोलिसांकडे तक्रार नोंदवावी.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!