
पुणे महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवून सहा जणांची दोन लाखांची फसवणूक
हडपसर,
पुणे महापालिकेत कंत्राटी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत सहा जणांकडून प्रत्येकी ३० हजार रुपये उकळून एकूण १ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधितांनी हडपसर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, हडपसर येथील राजश्री शाहू सोसायटी, माळवाडी परिसरातील रोहन कटके, ओंकार सिलवंत, अनिकेत तोंडे, मोनिका ढमे, विशाल लोंढे आणि सरिता साळवे या सहा जणांना अक्षय दत्तात्रय शिर्के (रा. फुरसुंगी) व राजाभाऊ शिंदे यांनी पुणे महापालिकेत ‘सुमित फॅसिलिटी सर्व्हिसेस’ या कंत्राटदारामार्फत नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले.
नोकरी मिळवून देण्याच्या मोबदल्यात प्रत्येकाकडून ३० हजार रुपये घेण्यात आले. संबंधित रक्कम ऑनलाइन व्यवहाराद्वारे दिल्याचे पुरावेही तक्रारदारांनी पोलिसांकडे सादर केल्याचा दावा केला आहे.
मात्र, पैसे घेऊनही सहा महिन्यांनंतरही नोकरी मिळाली नाही. तसेच घेतलेली रक्कमही परत करण्यात आली नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे आरोपींवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी तसेच फसवणुकीची रक्कम परत मिळवून द्यावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.
या व्यवहाराचे साक्षीदार म्हणून सूरज संजय चव्हाण, कुमार कोळपे, प्रशांत गवळी आणि लक्ष्मण भंडारे यांची नावे तक्रारीत नमूद करण्यात आली आहेत.
टीप : ही बातमी तक्रारदारांनी पोलिसांकडे दिलेल्या लेखी तक्रारीवर आधारित असून, संबंधित आरोपींची बाजू अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांच्या तपासानंतरच प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होईल.

