
हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत राष्ट्रीय जंतनाशक दिन; ९६ टक्के उद्दिष्टपूर्ती
हडपसर : पुणे महानगरपालिकेच्या हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त ५ ते १७ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना जंतनाशक औषधांचे वाटप करण्यात आले. या मोहिमेत दिलेल्या उद्दिष्टापैकी ९६ टक्के काम पूर्ण झाले असून, शाळा आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती वैद्यकीय क्षेत्रीय अधिकारी डॉ. स्वाती घनवट यांनी दिली.
या मोहिमेंतर्गत क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील १८ सरकारी शाळा, ३० खासगी शाळा आणि ८४ अंगणवाड्यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे संरक्षण आणि जंतसंसर्गापासून बचाव करण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विविध शाळांमध्ये जाऊन औषधोपचाराची मोहीम राबवली.
देवाची उरुळी येथील आरोग्यवर्धिनी केंद्रांतर्गत समता विद्यालयात विद्यार्थ्यांना जंतनाशक औषधे देण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. ऐश्वर्या गणदास, एएनएम धनश्री माने, एमपीडब्ल्यू संतोष गुळूमकर तसेच आशा सेविका रूपाली भोसले, रूपाली सुगंध, ललिताई ठेकर, उषा जगताप आणि निर्मला ठोसरे उपस्थित होत्या. विद्यालयाचे प्राचार्य व शिक्षकांनीही या उपक्रमात सहकार्य केले.
तसेच, आपला दवाखाना एचबीटी शेवाळेवाडी अंतर्गत महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्येही ५ ते १७ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना जंतनाशक औषधे देण्यात आली. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याणी शेवाळे, जीएनएम ब्रदर प्रदीप बांगर तसेच आशा सेविका सविता शिंदे आणि उज्ज्वला जगताप उपस्थित होत्या. शाळांचे प्राचार्य आणि शिक्षकांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.
आरोग्य विभागाच्या समन्वयातून मोहीम
माननीय आरोग्य अधिकारी, सहाय्यक आरोग्य अधिकारी, परिमंडळ वैद्यकीय अधिकारी आणि क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. क्षेत्रीय परिचारिका, दवाखान्यांतील डॉक्टर, परिचारिका, आशा सेविका, इतर आरोग्य कर्मचारी आणि अंगणवाडी सेविकांनी मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व शाळा, विद्यार्थी, शिक्षक, आरोग्य कर्मचारी आणि अंगणवाडी सेविकांचे हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या वैद्यकीय विभागातर्फे आभार मानण्यात आले.

