
ससाणेनगर-महंमदवाडी भुयारी मार्गावरील हाइटगेज तुटला
काही काळ वाहतूक ठप्प; पोलिसांकडून बॅरिकेड बाजूला करून वाहतूक सुरळीत
हडपसर : ससाणेनगर-महंमदवाडी रस्त्यावरील रवी पार्कजवळील भुयारी मार्गाच्या प्रवेशद्वारावरील लोखंडी हाइटगेज बॅरिकेड तुटल्याने आज दुपारी काही काळ वाहतूक ठप्प झाली. तुटलेले बॅरिकेड वाहतूक पोलिसांनी बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
हांडेवाडी, महंमदवाडी, सातव नगर, होळकरवाडी, आदर्शनगर, उंड्री, पिसोळी आणि वडाचीवाडी परिसराला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. पुणे-मिरज रेल्वेमार्गावरील गेट क्रमांक ६, ७ आणि ८ बंद करण्यात आल्यानंतर पर्यायी मार्ग म्हणून या भुयारी मार्गाचा वापर केला जात आहे. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते.
हाइटगेज तुटल्याने भुयारी मार्गात वाहनांची कोंडी झाली होती. परिणामी रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांनी तातडीने तुटलेले बॅरिकेड बाजूला केल्याने वाहतूक पूर्ववत झाली.
तातडीने बॅरिकेड बसविणार
काळेपडळ वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक देवेंद्र पवार यांच्याशी संपर्क साधला असता, “तुटलेले बॅरिकेड तातडीने वेल्डिंग करून पुन्हा बसविण्याचे काम पूर्ण करण्यात येईल,” अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, या मार्गावर ट्रक, हायवा, मिक्सर यांसह मोठ्या अवजड वाहनांची वाहतूक सातत्याने सुरू असते. त्यामुळे हाइटगेजची उंची आणि मजबुतीचा प्रश्न निर्माण होत आहे. अवजड वाहनांवर नियंत्रण ठेवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

