
PMPMLचा महत्त्वपूर्ण निर्णय; २९ वर्षांनंतर कर्मचाऱ्यांना पेन्शनचा हक्क
अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना तीन लाख, जखमींना एक लाखांची मदत; मालमत्तेच्या नुकसानीचीही भरपाई
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) कर्मचारी आणि प्रवाशांच्या दृष्टीने दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. वाहन व्यवहार खात्यातील कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्यासोबतच PMPML बसच्या अपघातात नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई देण्याचे धोरण लागू करण्यात आले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वाहन व्यवहार खात्यातील सर्व सेवकांना पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे १९९७ पासून निवृत्त, स्वेच्छानिवृत्त तसेच मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. पेन्शनसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची मुदत एक महिन्यावरून सहा महिने करण्यात आली आहे.
दरम्यान, PMPML बसच्या अपघातात नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी या बाबत स्वतंत्र धोरण नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. नव्या धोरणामुळे अपघातग्रस्त नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
अपघाती मदतीच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे. अपघाती मृत्यू झाल्यास पूर्वीच्या दोन लाख रुपयांऐवजी आता तीन लाख रुपये, तर जखमी व्यक्तीस पूर्वीच्या ५० हजार रुपयांऐवजी एक लाख रुपये मदत मिळणार आहे. हे धोरण खासगी बस पुरवठादारांनाही लागू राहणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने PMPMLचे हे निर्णय महत्त्वपूर्ण मानले जात आहेत. पुण्याच्या महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, यामुळे कर्मचारी आणि पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे म्हटले आहे.

