पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा; तीन उन्नत महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन

पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा; तीन उन्नत महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुभारंभ; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती

पुणे,

पुणे शहर आणि जिल्ह्याच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या तीन महत्त्वाकांक्षी उन्नत महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन शनिवारी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, आमदार तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.

भूमिपूजनापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत पुणे–शिरूर उन्नत द्रुतगती महामार्ग, तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्ग आणि हडपसर–यवत उन्नत महामार्ग या प्रकल्पांच्या मिनी मॉडेलची पाहणी केली. यावेळी नियोजित थांबे (इंटरचेंज), जोडमार्ग, वाहतूक व्यवस्था आणि इतर प्रस्तावित सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

भूमिपूजन करण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये पुणे–शिरूर उन्नत द्रुतगती महामार्ग, हडपसर–यवत उन्नत महामार्ग आणि तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्ग यांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे पुणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

हडपसर–यवत उन्नत महामार्गाची वैशिष्ट्ये

हडपसर–यवत उन्नत महामार्गाची एकूण लांबी सुमारे ३१.५ किलोमीटर असून, त्यामध्ये २५ किलोमीटर उन्नत बहुस्तरीय महामार्ग आणि ६ पदरी जमिनीवरील मार्ग विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पात उरुळी कांचनपर्यंत भविष्यातील मेट्रो मार्गासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. तसेच हा महामार्ग पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ आणि पुणे रिंगरोड यांना जोडणार असल्याने या परिसरातील वाहतूक अधिक सक्षम होणार आहे.

तळेगाव–चाकण–शिक्रापूर महामार्गाची वैशिष्ट्ये

सुमारे ५३.२ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पांतर्गत २६ किलोमीटर उन्नत बहुस्तरीय महामार्ग आणि ४ पदरी जमिनीवरील मार्ग विकसित करण्यात येणार आहे. जलदगती वाहने आणि स्थानिक वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध होणार असल्याने वाहतूक कोंडीत मोठी घट होईल. तसेच चाकण औद्योगिक परिसर, नाशिक फाटा, पुणे रिंगरोड आणि विविध राष्ट्रीय महामार्गांना प्रभावी जोडणी मिळाल्याने उद्योग, व्यापार आणि लॉजिस्टिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.

या तिन्ही महामार्ग प्रकल्पांमुळे पुणे जिल्ह्याच्या पायाभूत सुविधांना बळकटी मिळणार असून, औद्योगिक विकास, गुंतवणूक, मालवाहतूक आणि रोजगारनिर्मितीला नवी चालना मिळेल. भविष्यातील वाढत्या वाहतुकीचा विचार करून उभारण्यात येणारे हे महामार्ग पुणे जिल्ह्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!