
अतिक्रमण कारवाईला विरोध; जेसीबीवर वीट फेकून काच फोडली!
शाहिद इनामदार याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान शासकीय कामात अडथळा निर्माण करून जेसीबीवर सिमेंटची वीट फेकून काच फोडल्याची घटना हांडेवाडी रस्त्यावरील गंगा व्हिलेज परिसरात घडली. याप्रकरणी शाहिद इनामदार या तरुणाविरोधात काळेपडळ पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोंढवा-उंड्री क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत सोमवारी (दि. २३ नोव्हेंबर) हांडेवाडी रस्त्यावर अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत होती. गंगा व्हिलेज परिसरातील चायनीज हॉटेलचे अनधिकृत शेड हटविण्याचे काम सुरू असताना शाहिद इनामदार याने कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत जेसीबीच्या दिशेने सिमेंटची वीट फेकली. या घटनेत जेसीबीच्या समोरील काचेचे नुकसान झाले.
या घटनेची पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त सोमनाथ बनकर यांनी तातडीने दखल घेतली. संबंधित तरुणाविरोधात काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानुसार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कारवाईदरम्यान कोणीही शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही उपायुक्त सोमनाथ बनकर यांनी दिला आहे.
दरम्यान, आज (दि. २४ नोव्हेंबर) अतिक्रमण निर्मूलन विभागाने उंड्री परिसरात मोठ्या पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई केली. या कारवाईत सुमारे ४८ हजार ८०० चौरस फूट क्षेत्रावरील अतिक्रमणे हटविण्यात आल्याची माहिती आहे. अतिक्रमणविरोधी कारवाईला विरोध करणाऱ्यांवर प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याने अनधिकृत अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत.

