पहिल्याच पावसात हडपसरसह पुणे जलमय

पहिल्याच पावसात हडपसरसह पुणे जलमय

मना न्युज नेटवर्क
हडपसर,

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, ड्रेनेज चेंबर साफसफाई आणि पाणी निचऱ्यासाठी कोट्यवधी रुपयांची टेंडर काढण्यात आली. बैठका झाल्या. आढावे घेण्यात आले. अधिकाऱ्यांनी कागदोपत्री कामे पूर्ण झाल्याचे अहवालही दिले.मात्र, पावसाच्या पहिल्याच सरीत अक्षरशः दाणादाण उडाली आणि महापालिकेच्या तथाकथित “तयारी”चा फुगा काही मिनिटांत फुटला.

हडपसर, ससाणेनगर, सातववाडी, गोंधळेनगर, हांडेवाडी, महंमदवाडी, पिसोळी, उंड्री, गाडीतळ, माळवाडी, मगरपट्टा, मुंढवा, कोंढवा आणि मांजरी परिसर अक्षरशः पाण्याखाली गेले. रस्त्यांवर एवढे पाणी साचले की पुणेकरांना रस्ता शोधावा लागला की तलाव, अशी अवस्था निर्माण झाली.“नालेसफाई झाली होती तर पाणी साचले कसे?”हा प्रश्न आता प्रत्येक पुणेकर विचारत आहे. कारण मनपाने लाखो-कोट्यवधी रुपयांचा खर्च दाखवत नालेसफाई पूर्ण झाल्याचे सांगितले; पण प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये चेंबर साफच करण्यात आले नसल्याचे पहिल्याच पावसाने उघड केले.

हडपसर परिसरातील मुख्य रस्ते काही मिनिटांत जलमय झाले. दुचाकीस्वारांनी जीव मुठीत धरून पाण्यातून वाट काढली. अनेक वाहनं बंद पडली. काही ठिकाणी ड्रेनेज चेंबर तुंबल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर आले. प्रशासन मात्र नेहमीप्रमाणे बघ्याची भूमिका घेत बसल्याचे चित्र होते.नालेसफाईनंतर काढलेला गाळ तातडीने उचलणे नियमाने बंधनकारक आहे. मात्र, अनेक ठिकाणी ठेकेदारांनी तो गाळ आठ-आठ दिवस रस्त्याच्या कडेला टाकून ठेवला. पाऊस आला आणि तोच गाळ पुन्हा नाल्यात गेला. परिणामी संपूर्ण पाणी निचरा व्यवस्था ठप्प झाली.

हा केवळ निष्काळजीपणा नसून पुणेकरांच्या पैशांवर उघडपणे चाललेला खेळ असल्याची संतप्त भावना आता नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. कारण दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होतात, पण पहिल्या पावसात शहर बुडतेच.महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे दावे, ठेकेदारांची कामे आणि प्रत्यक्ष वास्तव यामध्ये प्रचंड तफावत असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. आता “ही नालेसफाई की मनपाच्या तिजोरीची सफाई?” असा संतप्त सवाल नागरिक थेट विचारू लागले आहेत.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!