
काळे-बोराटे नगरात पावसाचे पाणी साचल्याने नागरिक त्रस्त; १५ वर्षांपासून समस्या कायम
हडपसर,
काळे-बोराटे नगर, सर्व्हे क्रमांक ५३ येथील श्रीराम कॉलनीमध्ये मुसळधार पावसानंतर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिसरात पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी कोणतीही प्रभावी जलनिस्सारण व्यवस्था नसल्याने दरवर्षी हीच परिस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या तब्बल १५ वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यात परिसरात पाणी साचते. त्यामुळे घरांमध्ये पाणी शिरणे, वाहतुकीस अडथळा निर्माण होणे तसेच आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती निर्माण होते.
या समस्येबाबत अनेक वेळा संबंधित विभागाकडे लेखी तक्रारी करण्यात आल्या आहेत. अधिकारी पाहणीसाठी येतात, मात्र त्यानंतर कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
श्रीराम कॉलनीतील नागरिकांनी तातडीने पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी कायमस्वरूपी जलनिस्सारण व्यवस्था उभारावी व या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करावे, अशी मागणी केली आहे.
या मागणीसाठी सचिन फडतरे, हनुमंत राऊत, सुधीर जाधव, दिनेश शिंदे, आशा राऊत, स्नेहा शिंदे आणि सुवर्णा काळे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

