हडपसर-मांजरीत पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर! कार्यालयातच १५ दिवसांपासून पिण्याचे पाणी नाही!

हडपसर-मांजरीत पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर! कार्यालयातच १५ दिवसांपासून पिण्याचे पाणी नाही!

हडपसर | महाराष्ट्रनामा न्यूज

 

पुणे महानगरपालिकेच्या हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला असून, अनियमित आणि अशुद्ध पाणीपुरवठ्याच्या तक्रारी घेऊन सुमारे १०० ते १५० नागरिकांनी क्षेत्रीय कार्यालयात धाव घेतली. विशेष म्हणजे, नागरिकांच्या पाणीसमस्यांबाबत तक्रारी करण्यासाठी आलेल्या याच क्षेत्रीय कार्यालयात गेल्या पंधरा दिवसांपासून पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील ससाणेनगर, हडपसर गाव, काळे-बोराटे नगर, सातवडी आणि गोंधळेनगर यांसह विविध भागांतील नागरिकांना दररोज पाणीसमस्येचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत. परिसरात वेळेवर पाणीपुरवठा होत नाही, तर काही वेळा पाणी आले तरी ते अशुद्ध असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सुमारे १०० ते १५० नागरिक हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयात दाखल झाले. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण-तरुणी आणि नियमित मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांचाही समावेश होता. नागरिकांनी आपल्या भागातील अनियमित पाणीपुरवठा आणि अशुद्ध पाण्याच्या समस्येबाबत प्रशासनाकडे तक्रारी मांडल्या.

दरम्यान, हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालय हे नागरिकांसाठी महत्त्वाचे प्रशासकीय केंद्र आहे. या कार्यालयात कर विभाग, अतिक्रमण विभाग, जन्म-मृत्यू नोंदणी विभाग, वृक्ष छाटणी व उद्यान विभाग, पथ विभाग, चेंबर व ड्रेनेज विभाग, घनकचरा विभाग, कीटकनाशक विभाग आणि मालमत्ता विभाग असे विविध विभाग कार्यरत आहेत. त्यामुळे विविध कामांसाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक येथे येतात.

याशिवाय, कार्यालयाच्या आवारात आधार केंद्र असल्यामुळे आधारसंबंधित कामांसाठीही नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. हडपसर-मांजरी परिसरातील नागरिकांसाठी हे महत्त्वाचे केंद्र असल्याने महिला, लहान मुले, नवजात बालकांच्या माता, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्गाला येथे यावे लागते. मात्र, कार्यालयातच पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून कार्यालयातील कर्मचारी, शिपाई तसेच येथे येणारे नागरिक बाहेरून बाटलीबंद पाणी विकत घेत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांसह कर्मचाऱ्यांनाही स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे लागत आहेत. भर ऑक्टोबरच्या उन्हात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पैसे मोजावे लागत असताना, महापालिका कार्यालयात मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.

या प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर महाराष्ट्रनामा न्यूजच्या प्रतिनिधींनी हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त कुणाल धुमाळ यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत बैठकीसाठी गेल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर प्रशासकीय अधिकारी महेश खंदारे यांच्याशी संपर्क साधून प्रत्यक्ष भेट घेण्यात आली. यावेळी त्यांनी, त्यांच्या म्हणण्यानुसार, क्षेत्रीय कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी आपल्याकडे असून, तळमजला, पहिला आणि दुसऱ्या मजल्यावरील समस्यांशी आपला थेट संबंध नसल्याचे सांगितले. त्यामुळे या पाणीसमस्येवर त्यांच्याकडून ठोस उत्तर मिळाले नसल्याचे प्रतिनिधींनी सांगितले.

मात्र, आता सर्वसामान्य नागरिकांनी पाणीसमस्येची तक्रार नेमकी कोणाकडे करायची? क्षेत्रीय कार्यालयातच पिण्याचे पाणी उपलब्ध नसेल, तर या कार्यालयाच्या हद्दीतील नागरिकांना नियमित आणि स्वच्छ पाणी मिळते की नाही, याची जबाबदारी कोण घेणार? नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी नेमलेले अधिकारी या प्रश्नाकडे कधी लक्ष देणार? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.

नागरिक नियमितपणे मालमत्ता कर भरतात, विविध शासकीय कामांसाठी कार्यालयात येतात; मात्र त्यांना पिण्याच्या पाण्यासारखी मूलभूत सुविधा मिळत नसेल, तर ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. संबंधित प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन अनियमित आणि अशुद्ध पाणीपुरवठ्याच्या समस्येवर उपाययोजना कराव्यात. तसेच क्षेत्रीय कार्यालयातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तातडीने पूर्ववत करावी, अशी मागणी होत आहे.

आता हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि नागरिकांच्या परिसरातील पाणीसमस्या सोडवण्यासाठी महापालिका प्रशासन कोणती ठोस पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रनामा न्यूज | जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारा आवाज.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!