
विजयवाडा बायपासवर इलेक्ट्रिक कारला आग; तीन वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
विजयवाडा: विजयवाडा पश्चिम बायपास मार्गावर सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात इलेक्ट्रिक कारने दुभाजकाला धडक दिल्यानंतर कारने पेट घेतल्याने चौघांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोम्मारेड्डी रामदेव (वय ३९, रा. नुन्ना) हे कुटुंबीयांसह गुंटूर जिल्ह्यातील नांबुरु येथे कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून परत येत असताना विजयवाडा पश्चिम बायपासवर त्यांच्या ‘एमजी विंडसर ईव्ही’ कारचा ताबा सुटला आणि कार थेट दुभाजकावर आदळली. धडक इतकी जोरदार होती की, काही सेकंदांतच कारने पेट घेतला.
या आगीत रामदेव, त्यांची आई कोम्मारेड्डी अरुणा (६०), टि. विजया आणि तीन वर्षांचा बालक यांचा जागीच मृत्यू झाला. टियागुरा अरुणा या महिला गंभीर भाजल्या असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, आग इतकी भीषण होती की, प्रवाशांना बाहेर काढेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यास १५ मिनिटांहून अधिक वेळ लागला. नंतर क्रेनच्या सहाय्याने जळालेली कार बाजूला करण्यात आली.
या प्रकरणी पश्चिम विभाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, वेगावर नियंत्रण नसणे हे अपघाताचे कारण असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, मंत्री नारा लोकेश यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

