शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये – हवामान विभाग

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये – हवामान विभाग

मुंबई,
राज्यातील विविध भागांमध्ये आज (2 जून) विजांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तर कोकण, दक्षिण कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. या भागांमध्ये ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकण-गोवा परिसरातही ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मच्छिमारांसाठी विशेष इशारा

लक्षद्वीप, मालदीव परिसर, केरळ किनारपट्टी आणि लगतच्या समुद्र भागात ताशी 35 ते 45 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून झोतांचा वेग ताशी 55 किमीपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे या कालावधीत मच्छिमारांनी समुद्रात जाणे टाळावे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मुंबईत पुढील 48 तास ढगाळ वातावरण

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील 48 तास आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. रात्री किंवा पहाटेच्या सुमारास मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. शहरातील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

तापमानात होणार घट

पुढील चार ते पाच दिवसांत महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांतील कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तापमानात विशेष बदल अपेक्षित नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

मान्सूनशी संबंध नाही

मुख्यमंत्री **देवेंद्र फडणवीस** यांनी नागरिक आणि शेतकऱ्यांना सावधगिरीचा इशारा देताना सांगितले की, सध्या पडणाऱ्या वादळी पावसाचा मान्सूनशी कोणताही संबंध नाही. मान्सून अद्याप केरळपर्यंत पोहोचलेला नसून महाराष्ट्रात त्याच्या आगमनासाठी किमान 10 जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.”शेतकरी बांधवांनी मान्सूनपूर्व वादळी पावसावर विश्वास ठेवून पेरणीची घाई करू नये. स्थिर आणि समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच पेरणीचे नियोजन करावे,” असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

विजांच्या कडकडाटावेळी घ्या खबरदारी

विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली, वीज खांब, ट्रान्सफॉर्मर किंवा विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे. तसेच स्वतःची आणि पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जून महिन्यात देशभरातील पावसाचे प्रमाण सरासरीच्या सुमारे 92 टक्के राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जून महिन्यातही उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम राहू शकतो. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उष्णतेचा तडाखा जाणवण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!