
गणेशोत्सव २०२६ साठी पुणे मनपाची वैद्यकीय यंत्रणा सज्ज
पुणे, गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत भाविकांसाठी वैद्यकीय सेवांची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
१) दगडूशेठ हलवाई येथे ३ बेडचे ICU
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, बुधवार पेठ येथे दि. १४/०९/२०२६ ते दि. २५/०९/२०२६ या कालावधीत गणेश दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून अत्यावश्यक व तातडीची वैद्यकीय सेवा देण्यासाठी *०३ बेडचे ICU* उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या शिबिरासाठी मनपामार्फत ०१ भूलतज्ज्ञ, ०३ वैद्यकीय अधिकारी, ०४ नर्स आणि ०१ अटेंडंट यांची *२४x७ तीन पाळ्यांमध्ये (सकाळ, दुपार, रात्र)* नियुक्ती करण्यात आली असून आवश्यक औषधसाठा देखील पुरवण्यात येणार आहे.
२) विसर्जन मिरवणुकीसाठी ३ ठिकाणी रुग्णवाहिका सज्ज
शुक्रवार दि. २५/०९/२०२६ रोजी अनंत चतुर्दशी असून विसर्जन मिरवणुका संपन्न होणार आहेत. दि. २५ व २६/०९/२०२६ रोजी मिरवणूक संपेपर्यंत शहरातील खालील ३ ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध असतील :
१. डेक्कन जिमखाना, नटराज टॉकीज जवळ
२. नूतन मराठी विद्यालयाजवळ, लक्ष्मी रस्ता
३. अलका टॉकीज चौक
प्रत्येक रुग्णवाहिकेसोबत ०१ वैद्यकीय अधिकारी, ०१ औषध निर्माता, ०१ परिचारिका व ०१ सेवक असणार असून आवश्यक सामग्री व औषधे उपलब्ध असतील.
३) १५ क्षेत्रीय कार्यालयांत वैद्यकीय पथके
शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत विसर्जन घाटांवर परिमंडळ वैद्यकीय अधिकारी (वर्ग-१) व क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत वैद्यकीय पथके उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
४) १०८ च्या १९ रुग्णवाहिका
१०८ रुग्णवाहिका सेवेमार्फत १९ रुग्णवाहिका (०५ विसर्जन मिरवणुकीत व ०५ इतर जास्त वर्दळीच्या ठिकाणी) उपलब्ध करून देण्याबाबत पत्र देण्यात आले आहे. तसेच वैद्यकीय महाविद्यालये, इम्पॅक्ट गुरु फाउंडेशन व IHMP सोसायटी यांच्यामार्फतही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याबाबत पत्र देण्यात आले आहे.
५) २७५ ठिकाणी आरोग्य शिबिरे
दि. १०/०९/२०२६ रोजी मा. अतिरिक्त आयुक्त यांनी श्री गणेशा आरोग्याचा अभियान २०२६ चा आढावा घेतला. त्यामध्ये दि. १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान आरोग्य शिबिरे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मनपा अंतर्गत मोठी गणेश मंडळे व सर्वत्रिक दवाखाने मिळून एकूण *२७५ ठिकाणी* आरोग्य शिबिरांचे नियोजन आहे.
मागील वर्षीची आकडेवारी :
२०२५ च्या गणेशोत्सवात दगडूशेठ ट्रस्ट येथे १५७ रुग्णांना ICU मध्ये उपचार देण्यात आले. संपूर्ण उत्सव काळात बांधकाम व अंतर्गत विभागामार्फत ३,००० ते ३,५०० रुग्णांना तर गणेश चतुर्थीपासून आजअखेर ७,००० ते ८,००० रुग्णांना प्राथमिक उपचार देण्यात आले आहेत.अशी माहिती पुणे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. निना बोऱ्हाडे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे.

