‘हरित पुणे, समृद्ध पुणे’ उपक्रम; ५ रुपयांत मिळणार स्थानिक वृक्षांची रोपे

‘हरित पुणे, समृद्ध पुणे’ उपक्रम; ५ रुपयांत मिळणार स्थानिक वृक्षांची रोपे

पुणे :

पुणे शहराचे पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी आणि वाढत्या तापमानावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे महानगरपालिकेने ‘हरित पुणे, समृद्ध पुणे’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वनमहोत्सवांतर्गत अल्प दरात रोपे विक्री, वृक्षारोपण आणि बीज संकलन केंद्र या उपक्रमांचे उद्घाटन शुक्रवारी (५ जून) छत्रपती संभाजीराजे उद्यान, जंगली महाराज रस्ता येथे करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते झाले. यावेळी नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे मुख्य समन्वयक विश्वस्त मकरंद टिल्लू, अॅड. राजेंद्र आगरवाल, तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

महापालिकेचे सह आयुक्त तथा वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य सचिव डॉ. अशोक दि. घोरपडे, मुख्य अभियंता राजेश बनकर, उद्यान अधीक्षक संतोषकुमार कांबळे, प्रीती प्रसाद, स्नेहल हरपळे, सहाय्यक उद्यान अधीक्षक रत्नाकर करडे यांच्यासह उद्यान विभागाचे अधिकारी आणि कर्मचारीही कार्यक्रमाला उपस्थित होते.

‘बेल’ वृक्षाचे रोपण, नागरिकांना रोपांचे वाटप

कार्यक्रमादरम्यान अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते इच्छुक वृक्षप्रेमी, नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांना वृक्षरोपांचे वाटप करण्यात आले. तसेच छत्रपती संभाजीराजे उद्यान परिसरात ‘बेल’ प्रजातीच्या वृक्षाचे रोपणही करण्यात आले.

शहरभर वृक्षारोपण मोहिम

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुणे शहरातील सर्व १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत आणि विविध उद्यानांमध्ये वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सहभागातून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात आली. पुणे महानगरपालिकेच्या नदी पुनर्जीवन प्रकल्पांतर्गतही वृक्षारोपण करण्यात आले.

फक्त ५ रुपयांत मिळणार स्थानिक जातींची रोपे

पुणे महापालिका वृक्ष प्राधिकरणामार्फत ५ जून ते १४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत एक ते दीड वर्षे वयाची स्थानिक जातींची रोपे केवळ ५ रुपये प्रति रोप या सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

याशिवाय नागरिकांनी त्यांच्या परिसरातील वृक्ष व फळझाडांच्या बिया, बीजगोळे आणि रोपनिर्मितीसाठी उपयुक्त बीज साहित्य बीज संकलन केंद्रात जमा करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

सेंद्रिय खतही उपलब्ध

या उपक्रमादरम्यान घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत तयार करण्यात आलेले सेंद्रिय खतही नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

कुठे आणि कधी मिळणार रोपे?

छत्रपती संभाजीराजे उद्यान येथील रोपवाटिका, जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व रंगमंदिर शेजारी, शिवाजीनगर येथे हा उपक्रम ५ जून ते १४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सुरू राहणार आहे.

वेळ : सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत
(रविवार व शासकीय सुट्ट्या वगळून)

महापालिकेने जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि ‘हरित पुणे’ मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क

  • रत्नाकर करडे, सहाय्यक उद्यान अधीक्षक – ९६८९९३८५२३
  • रविंद्र कांबळे, वृक्ष निरीक्षक – ८३०८८४१५२५

“हरित पुणे, समृद्ध पुणे” या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!