अभय योजना म्हणजे थकबाकीदारांसाठी लाल गालिचा ?

अभय योजना म्हणजे थकबाकीदारांसाठी लाल गालिचा ?

Seem FlatNews has a very high conversion rate, my website increased traffic and AdSene clicks a lot. I am vert happy this this design.

६७,९५६ सराईत करबुडव्यांवर कारवाईची मागणी तीव्र

वेळेवर कर भरणाऱ्या नागरिकांची चेष्टा; महापालिकेच्या मवाळ भूमिकेमुळे थकबाकीदार बेफाम

पुणे : पुणे महापालिकेच्या अभय योजनांचा वारंवार फायदा घेऊनही पुन्हा थकबाकीदार बनणाऱ्या आणि यंदाची अभय योजना देखील धुडकावून लावणाऱ्या तब्बल ६७ हजार ९५६ सराईत मिळकतकर थकबाकीदारांविरोधात संतापाची लाट उसळली आहे. “प्रामाणिक करदात्यांना शिक्षा आणि करबुडव्यांना अभय” अशी संतप्त भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.

सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी पुणे महापालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रातून प्रशासनाच्या धोरणावर थेट हल्लाबोल केला आहे. “महापालिका प्रशासनाला उत्पन्नवाढीची इतकी घाई आहे की, सराईत थकबाकीदारांनाही वारंवार अभय योजनेच्या पायघड्या घातल्या जात आहेत. मात्र त्यांनाही आता प्रशासनाचे भय उरलेले नाही,” असा घणाघात त्यांनी केला.

महापालिकेने १५ नोव्हेंबर २०२५ ते १५ मार्च २०२६ या कालावधीत अभय योजना लागू केली होती. मात्र माहिती अधिकारातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार, २०२०-२१ आणि २०२१-२२ च्या अभय योजनांचा लाभ घेणाऱ्यांपैकी हजारो मिळकतधारक पुन्हा थकबाकीदार झाले. धक्कादायक बाब म्हणजे, पुन्हा एकदा अभय योजना जाहीर करूनही त्यांनी कर भरण्याकडे पाठ फिरवली.

धक्कादायक आकडेवारी

  • २०२०-२१ मधील अभय योजनेचा लाभ घेतलेले : १,४९,६८३
  • त्यापैकी पुन्हा थकबाकीदार झालेले : ६७,४७५
  • यंदाची अभय योजना देखील नाकारणारे : ४२,६९६
  • २०२१-२२ मधील अभय योजनेचा लाभ घेतलेले : ६६,४५४
  • त्यापैकी पुन्हा थकबाकीदार झालेले : ३८,६४२
  • यंदाची अभय योजना देखील नाकारणारे : २५,२६०

एकूणच तब्बल ६७,९५६ सराईत थकबाकीदारांनी महापालिकेच्या अभय योजनेलाच केराची टोपली दाखवली आहे.

“आता तरी कारवाई करा!”

“वेळेवर मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना नेमका कोणता संदेश दिला जात आहे? प्रामाणिकपणा मूर्खपणा आहे का?” असा संतप्त सवाल उपस्थित करत विवेक वेलणकर यांनी महापालिकेकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.

थकबाकीदारांची मालमत्ता जप्ती, बँक खाती गोठवणे, नळजोड तोडणे, मालमत्तेवर जप्तीची नोटीस लावणे अशा कठोर उपाययोजना तात्काळ राबवाव्यात, अन्यथा अभय योजना ही फक्त करबुडव्यांसाठीची ‘सवलत योजना’ बनल्याचा आरोप अधिक तीव्र होणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

मुख्य सवाल

  • वारंवार अभय योजना देऊन महापालिका नेमका कोणाला प्रोत्साहन देते आहे?
  • प्रामाणिक करदात्यांपेक्षा करबुडव्यांनाच जास्त महत्त्व दिले जात आहे का?
  • ६७,९५६ सराईत थकबाकीदारांवर ठोस कारवाई कधी होणार?

महापालिकेने वेळेवर कर भरणाऱ्यांसाठी कोणतीही प्रोत्साहन योजना आणली नाही, मात्र थकबाकीदारांसाठी सतत सवलती जाहीर केल्या जात असल्याने प्रामाणिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. “कर भरला तर मूर्ख, थकवला तर अभय” अशी उपरोधिक प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर उमटू लागली आहे.

CATEGORIES
TAGS
Share This

COMMENTS

Disqus (0 )
error: Content is protected !!