
शाळांभोवती जंक फूडला ‘नो एन्ट्री’
मुंबई,
राज्यातील विद्यार्थ्यांना सुरक्षित, सकस आणि पौष्टिक आहार मिळावा यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व शाळांच्या परिसरात जंक फूडच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात आले असून, सुरक्षित आहारासाठी नवे नियम लागू करण्यात आले आहेत.
नव्या नियमांनुसार शाळेच्या ५० मीटर परिसरात चिप्स, शीतपेये, चॉकलेट, पॅकेज्ड स्नॅक्ससह साखर, मीठ आणि चरबीचे (HFSS) प्रमाण अधिक असलेल्या खाद्यपदार्थांची विक्री, जाहिरात तसेच मोफत वाटप करण्यास बंदी राहणार आहे.
एफडीएने शाळा व्यवस्थापन आणि कॅन्टीन चालकांना विद्यार्थ्यांसाठी फळे, अंकुरित धान्य, दूध, ताक, ताजे व पौष्टिक पदार्थ उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी आहाराच्या सवयी विकसित करण्यासाठी जनजागृती करण्यावरही भर देण्यात आला आहे.
या नियमांच्या अंमलबजावणीसाठी शाळांची नियमित तपासणी केली जाणार असून, वर्षातून किमान दोन वेळा निरीक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळा किंवा विक्रेत्यांविरोधात अन्न सुरक्षा कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा एफडीएने दिला आहे.
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये वाढणारे लठ्ठपणा, मधुमेह आणि इतर जीवनशैलीशी संबंधित आजार रोखण्यासाठी शालेय स्तरावरच आरोग्यदायी आहाराची सवय लागणे आवश्यक आहे. याच उद्देशाने हे नवे नियम लागू करण्यात आले असून, राज्यातील सर्व शाळांनी त्यांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

