
मिरवणूक मार्ग व रस्ते, वाहतूक आणि पायाभूत सुविधांचा आढावा
पुणे,
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आमदार हेमंत रासणे, महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम व मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून संयुक्त पाहणी; प्रमुख मिरवणूक मार्ग व परिसरातील रस्ते, वाहतूक आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेतला
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिक व भाविकांना सुरक्षित आणि सुरळीत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कसबा व विश्रामबाग वॉर्ड कार्यालयाच्या हद्दीतील प्रमुख मिरवणूक मार्ग व परिसराची संयुक्त पाहणी करण्यात आली. आमदार हेमंत रासणे, महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही पाहणी करण्यात आली.
यावेळी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने रस्त्यांची स्थिती, खड्डे, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, विद्युत व्यवस्था, पादचारी मार्ग, अतिक्रमण तसेच वाहतूक व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला. पाहणीदरम्यान निदर्शनास आलेल्या त्रुटींवर तातडीने उपाययोजना करून गणेशोत्सवापूर्वी सर्व आवश्यक कामे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.
कसबा गणपती मंदिर येथून पाहणीस सुरुवात करून शिवाजी रोडमार्गे भाऊ रंगारी गणपती, तांबडी जोगेश्वरी, केळकर रोड, पासोड्या विठोबा मंदिर, सोन्या मारुती मंदिर, सोमेश्वर मंदिर, रांका ज्वेलर्स, महाराणा प्रताप रस्ता मार्गे कस्तुरी चौक, जैन मंदिर नाईक हॉस्पिटल मार्गे फडगे पोलिस चौकी, सेवा मित्र मंडळ, मंडई गणपती, दगडूशेठ देखावा, गुरूजी तालीम, लक्ष्मी रस्ता, पुरम चौक तसेच इतर महत्त्वाच्या परिसरांची पाहणी करण्यात आली.
काँक्रीट व डांबरी रस्त्यांवरील खड्डे, पाणीपुरवठा, ड्रेनेज व महावितरणच्या केबल खोदाईनंतर अपूर्ण राहिलेली रस्ते दुरुस्ती, तसेच पदपथ व अरुंद रस्त्यांवर पादचाऱ्यांना अडथळा ठरणारे विद्युत डीपी बॉक्स याचीही पाहणी करण्यात आली तसेच काही ठिकाणी ड्रेनेज लाईनमधील गळती, तुंबलेल्या वाहिन्या आणि खोदाईनंतर रस्त्यांचे अपूर्ण समतलीकरण याबाबतही संबंधित विभागांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी संबंधित क्षेत्रीय कार्यालयांनी आपापल्या हद्दीतील खड्डे व खराब रस्त्यांची दुरुस्ती तातडीने पूर्ण करावी, तसेच पथ विभागाने या कामांवर प्रत्यक्ष देखरेख ठेवून दुरुस्तीची कामे दर्जात्मक पद्धतीने पूर्ण होतील याची खात्री करावी, अशा सूचना देण्यात आल्या.
कसबा, मंडई आणि स्वारगेट मेट्रो स्टेशन परिसरातील मोठ्या प्रमाणातील गर्दीचा विचार करून या परिसरातील रस्ते सुस्थितीत व खड्डेमुक्त ठेवण्यावर विशेष भर देण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच पाणीपुरवठा, ड्रेनेज, महावितरण व इतर युटिलिटी विभागांनी गणेशोत्सव संपेपर्यंत नवीन रस्ते खोदाई टाळावी आणि पूर्वी करण्यात आलेल्या खोदाईची कामे पूर्ण करून रस्ते समतल करावेत, असे निर्देश देण्यात आले.
ड्रेनेज विभाग व संबंधित क्षेत्रीय कार्यालयांनी मुख्य वाहिन्यांची पाहणी करून गळती व तुंबलेल्या वाहिन्या तातडीने दुरुस्त कराव्यात, तर महावितरण व विद्युत विभागाने उघड्या तारा सुरक्षित कराव्यात आणि पादचाऱ्यांना अडथळा ठरणाऱ्या डीपी बॉक्सबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या.
गणेशोत्सवाच्या कालावधीत शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिक व भाविकांची गर्दी होत असल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने समन्वयाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही यावेळी निर्देशित करण्यात आले.
यावेळी मा. मुख्य अभियंता (पथ विभाग), श्री. राजेश बनकर, मा. मुख्य अभियंता (विद्युत विभाग), श्रीमती मनीषा शेकटकर, मा. उपायुक्त, अतिक्रमण विभाग, श्री. सोमनाथ बनकर, मा. उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग, श्री. संतोष वारुळे, मा. अधीक्षक अभियंता, पथ विभाग श्री. रोहिदास गव्हाणे, मा. सहाय्यक महापालिका आयुक्त, श्री. मुल्ला, मा. सहाय्यक महापालिका आयुक्त, श्री. राजेश गुर्रम, तसेच महावितरणचे अधिकारी आणि महानगपालिकेचे संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

