मिरवणूक मार्गावरील सुविधांची अतिरिक्त महापालिका आयुक्तांकडून पाहणी

मिरवणूक मार्गावरील सुविधांची अतिरिक्त महापालिका आयुक्तांकडून पाहणी

पुणे, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील रस्ते, फुटपाथ व संबंधित पायाभूत सुविधांची पाहणी अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांनी आज सकाळी ७ वाजल्यापासून पासून केली.

श्री गणेशोत्सव पूर्व तयारीबाबत  महापौर,  महापालिका आयुक्त अतिरिक्त महापालिका आयुक्त स्तरावर बैठका घेऊन सर्व खड्डे भरणे, चैम्बर दुरुस्ती व अन्य कामकाज करून उत्सव सुरळीत पार पाडण्याचे आदेश वेळोवेळी दिले आहेत. अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने केलेल्या कामकाजाची पाहणी करण्यात आली. अजून ही काही ठिकाणी मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविणे, फुटपाथ दुरुस्ती, चेंबरची झाकणे रस्त्याच्या समपातळीत आणणे तसेच खोदाईनंतरची कामे प्रलंबित असल्याने असे रस्ते पूर्ववत करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी संबंधित अधिकारी व विभागांना देण्यात आले.

बेलबाग चौक ते अलका टॉकीज, लक्ष्मी रोड, टिळक रोड, मंडई परिसर, केळकर रोड व कुमठेकर मार्ग या प्रमुख विसर्जन मिरवणूक मार्गावरील नादुरुस्त, उंचसखल व ब्लॉक्स निघालेले फुटपाथ तातडीने दुरुस्त करून समतल व सुरक्षित करण्याचे आदेश देण्यात आले. रस्त्याच्या पातळीपेक्षा उंच किंवा खाली असलेली ड्रेनेज व पावसाळी चेंबरची झाकणे रस्त्याच्या समपातळीत बसविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

मागील वर्षी सायकल ग्रँड टूर अंतर्गत करण्यात आलेल्या फुटपाथ दुरुस्ती, रंगकाम व इतर कामांमध्ये आढळलेल्या त्रुटी संबंधित कंत्राटदारांकडून दोषदायित्व कालावधीअंतर्गत (DLP) तातडीने दुरुस्त करून घेण्यात याव्यात, असे निर्देश देण्यात आले. तसेच MSEDCL व इतर संस्थांनी केलेल्या खोदाईनंतर रस्ते व फुटपाथ पूर्ववत करण्याचे काम मानक कार्यपद्धतीनुसार (SOP) समाधानकारक झाले नसल्यास, संबंधित संस्थांकडून ते काम तातडीने करून घेण्यास सांगण्यात आले.

खोदाईनंतर रस्त्यावर किंवा फुटपाथवर साचलेली माती, मुरूम, खडी, बांधकाम साहित्य व इतर अवशेष तातडीने हटवून रस्ते व फुटपाथ नागरिकांच्या वापरासाठी मोकळे करण्याचे निर्देश देण्यात आले. खड्डे बुजविताना एजिंग कटिंग, आवश्यक कॉम्पॅक्शन, योग्य भराव व अंतिम पृष्ठभागाचे समतलीकरण ही प्रक्रिया SOP नुसार करण्याचे आदेश देण्यात आले. निकृष्ट किंवा अपूर्ण कामे आढळल्यास संबंधित कंत्राटदारांवर करारातील अटी व प्रचलित नियमांनुसार दंडात्मक कार्यवाही करावी. तसेच कामातील हलगर्जीपणासाठी जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून प्रशासकीय कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

विसर्जन मिरवणूक मार्गावर कोणताही खड्डा, नादुरुस्त फुटपाथ, उघडे किंवा उंचसखल चेंबर अथवा अन्य धोकादायक स्थिती राहणार नाही, याची संबंधित क्षेत्रीय कार्यालय व पथ विभागाने संयुक्तपणे खात्री करावी, असेही सांगण्यात आले. पाहणी दौऱ्यांमध्ये संबंधित क्षेत्रीय अधिकारी व वॉर्ड अभियंते अनिवार्यपणे उपस्थित राहतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश सहायक आयुक्तांना देण्यात आले.

खाजगी बांधकामस्थळी रस्त्यावर पाणी साचत असल्यास संबंधित विकासकांना तातडीने नोटीस बजावून पाण्याचा योग्य व कायमस्वरूपी निचरा करण्याची व्यवस्था करून घ्यावी. पाणी साचल्यामुळे रस्ता किंवा फुटपाथ खराब झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विकासकाची राहील, असे स्पष्ट करण्यात आले.

सदर परिसरातील बहुतांश रस्ते १२ मीटरपेक्षा कमी रुंदीचे असले तरी मोठ्या पॅचची कामे मुख्य पथ कार्यालयामार्फत, तर बहुतांश कामे संबंधित क्षेत्रीय कार्यालयामार्फत सुरू आहेत. त्यामुळे संबंधित क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त व झोनल उपायुक्त यांनी खड्डे बुजविणे, चेंबरची झाकणे समपातळीत आणणे व इतर कामांची प्रत्यक्ष स्थळपाहणी करून कामे निर्धारित गुणवत्तेनुसार व SOP प्रमाणे होत आहेत, याची खात्री करावी, असे निर्देश देण्यात आले.

वरील सर्व कामे येत्या दोन दिवसांत पूर्ण करून प्रत्येक कामाचा जिओ-टॅग्ड छायाचित्रांसह अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पाहणीवेळी प्र. मुख्य अभियंता राजेश बनकर (पथ विभाग), अधीक्षक अभियंता गव्हाणे (पथ विभाग), विश्रामबागवाडा उपअभियंता तसेच संबंधित वॉर्ड कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!