गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये लेझर लाईटला ‘नो एंट्री’

गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये लेझर लाईटला ‘नो एंट्री’

पुणे ग्रामीणमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान वापरास प्रतिबंध

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये होणारा लेझर लाईटचा वापर नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत असल्याने पुणे ग्रामीण जिल्ह्यात त्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ अन्वये याबाबत आदेश जारी केला आहे.

पुणे ग्रामीण जिल्ह्यात १४ सप्टेंबरपासून २५ सप्टेंबर २०२६पर्यंत गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये लेझर लाईटचा वापर करता येणार नाही. अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर विसर्जन मिरवणुका निघतात. या मिरवणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात लेझर लाईटचा वापर होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

लेझर लाईटचा प्रकाश थेट डोळ्यांवर पडल्यास डोळ्यांच्या पडद्याला इजा होण्याची शक्यता असते. विशेषतः मिरवणुकीतील नागरिक, भाविक आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच लेझर लाईटमुळे मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठीही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करणारी व्यक्ती, संस्था, मंडळ किंवा संचालक यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ तसेच प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी तसेच मिरवणूक आयोजकांनी आदेशाचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!