खराडी–केशवनगर नदीवरील पूल १५ दिवसांनी वाहतुकीसाठी खुला होणार

खराडी–केशवनगर नदीवरील पूल १५ दिवसांनी वाहतुकीसाठी खुला होणार

अप्रोच रोडची कामे अंतिम टप्प्यात; अपूर्ण स्थितीत पूल सुरू करणे धोकादायक, महापालिकेचे स्पष्टीकरण

पुणे,

खराडी–केशवनगर नदीवरील पूल अंतिम टप्प्यात असून, अप्रोच रोडची कामे पूर्ण झाल्यानंतरच तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे पुणे महापालिकेने स्पष्ट केले आहे. काही राजकीय संघटनांकडून १ ऑगस्ट रोजी पूल परस्पर वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या संदेशांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने गुरुवारी जाहीर प्रकटनाद्वारे वस्तुस्थिती मांडली.

महापालिकेच्या माहितीनुसार, पूल सुरू झाल्यानंतर खराडी, नगर रोड, केशवनगर, मुंढवा, मांजरी आणि हडपसर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, पुलाच्या २४ मीटर अप्रोच रोडवरील युटिलिटी स्थलांतराचे काम सध्या सुरू आहे. तसेच अप्रोच रस्त्यात येणारी वृक्ष हटविण्याची प्रक्रिया सुरू असून, काही ठिकाणची जमीन ताब्यात घेण्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे. अप्रोच रोडचे डांबरीकरण आणि इतर अनुषंगिक कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत.

महापालिकेने स्पष्ट केले की, अपूर्ण कामांच्या स्थितीत पूल वाहतुकीसाठी खुला केल्यास अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रथम वृक्ष हटविणे, अप्रोच रोडची सर्व कामे पूर्ण करणे आणि सुरक्षिततेची खात्री करूनच पूल सुरू करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या अंदाजानुसार, उर्वरित कामे येत्या १५ दिवसांत पूर्ण होतील. त्यानंतर पूल नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.

दरम्यान, अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि.) यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, अधिकृत निर्णयानंतरच पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!