काळे बोराटे नगरमध्ये कोयत्यांचा धाक; ११ वाहनांची तोडफोड!

काळे बोराटे नगरमध्ये कोयत्यांचा धाक; ११ वाहनांची तोडफोड!

तीन तरुण हातात कोयते घेऊन फिरत असल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती; पेबल पार्कजवळ १७ आसनी वाहनाच्या काचा फोडल्या

 

हडपसर : काळे बोराटे नगर ते आदर्श नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अज्ञात व्यक्तींनी वाहनांची तोडफोड केल्याची घटना काल रात्री घडली. या घटनेत एकूण ११ वाहनांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामध्ये १७ आसनी प्रवासी वाहनासह एक दुचाकी आणि इतर चारचाकी वाहनांचा समावेश आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास तीन तरुण हातात कोयते घेऊन परिसरात फिरत होते. यावेळी त्यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या. पेबल पार्कजवळ उभ्या असलेल्या १७ आसनी प्रवासी वाहनाचीही तोडफोड करण्यात आली. हा प्रकार प्रत्यक्ष पाहणाऱ्या नागरिकांना तरुणांच्या हातातील कोयते पाहून भीती वाटली.

त्यानंतर हे तिघे तरुण संकेत पार्कच्या दिशेने जाताना दिसले. तेथेही वाहनांची तोडफोड करण्यात आल्याचे नुकसानग्रस्त वाहनमालकांनी सांगितले. या घटनेत एकूण ११ वाहनांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

६५ कॉलन्यांचा परिसर; दाट लोकवस्तीमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

काळे बोराटे नगर, म्हसोबा नगर आणि सर्व्हे क्रमांक ३०२ या परिसरात एकूण ६५ कॉलन्या असून येथे मोठ्या प्रमाणात दाट लोकवस्ती आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत परिसरातील सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या भागात वारंवार गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

त्यामुळे संपूर्ण ६५ कॉलन्यांच्या परिसरात नियमित पोलीस गस्त वाढवावी, महत्त्वाच्या चौकांमध्ये आणि संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, तसेच गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

हडपसर नागरिक कृती समितीची पोलिसांकडे लेखी मागणी

या संदर्भात हडपसर नागरिक कृती समितीच्या वतीने सविता हिंगणे, अक्षय नवले, सूरज कुदळे, अंकुश कुदळे, मयूर फडतरे, गोविंद कुंजीर, शिवाजी हिंगणे, खंडेराव जगताप आणि गुलाब वाडकर यांनी पोलिसांकडे लेखी मागणी केली आहे.

६५ कॉलन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन संपूर्ण परिसरात नियमित पोलीस गस्त सुरू करावी, रात्रीची गस्त प्रभावी करावी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी समितीने केली आहे.

काळे बोराटे नगर परिसर काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने या घटनेतील संशयितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. दाट लोकवस्तीच्या या परिसरात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!