DP रस्ता कागदावरच; २८ वर्षांपासून कर भरूनही विकास रखडला

DP रस्ता कागदावरच; २८ वर्षांपासून कर भरूनही विकास रखडला

रवी पार्कजवळील भुयारी मार्गातील वाहतूक कोंडीचा प्रश्न; रस्ता विकसित करण्याची नागरिकांची मागणी

हडपसर,

ससाणे नगर–म्हमदवाडी मार्गावरील रवी पार्कजवळील भुयारी मार्गातून बाहेर पडल्यानंतर उजव्या बाजूला विकसित आराखड्यात (DP) प्रस्तावित असलेला रस्ता अद्याप प्रत्यक्षात आलेला नाही. पालिकेत हा भाग समाविष्ट झाल्यानंतरही रस्ता विकसित न झाल्याने नागरिकांना अरुंद मार्गातून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

भुयारी मार्गातील रस्त्याची रुंदी अपुरी असल्याने दोन मोठी वाहने एकाच वेळी जाऊ शकत नाहीत. DP रस्ता विकसित झाल्यास हांडेवाडी रस्त्यावरून येणारी वाहने रवी पार्कजवळून थेट भुयारी मार्गाकडे वळविता येतील. त्यामुळे काळे बोराटे नगर, म्हसोबा नगर आणि आदर्श नगरकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल.

या रस्त्याचा फायदा काळे बोराटे नगर, हांडेवाडी, सातव नगर, उद्योग नगर, होळकरवाडी, वडाचीवाडी, महमंदवाडी, उंड्री, पिसोळी आणि औताडेवाडी परिसरातील नागरिकांना होणार असून, प्रवासाचा वेळ व इंधनाची बचत होण्यास मदत होईल.

“२८ वर्षे कर भरतोय, विकास कुठे?”

नागरिक अर्जुन सातव म्हणाले, “गेल्या २८ वर्षांपासून आम्ही महापालिकेला कर भरत आहोत. मात्र, विकासकामांसाठी निधी नाही, असे उत्तर वारंवार दिले जाते. हडपसरच्या विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.”

विभागांची जबाबदारी निश्चित करा

नगररचना विभागाने DP रस्त्याची हद्द, रुंदी व आरक्षणाची स्थिती स्पष्ट करावी. मालमत्ता विभागाने जमीन महापालिकेच्या ताब्यात आहे का, तसेच भूसंपादनाची आवश्यकता आहे का, हे स्पष्ट करावे. पथ विभागाने तांत्रिक पाहणी, सर्वेक्षण व अंदाजपत्रक तयार करून रस्त्याच्या कामाची कार्यवाही करावी, तर अर्थ विभागाने आवश्यक निधीची तरतूद करावी. संबंधित लोकप्रतिनिधींनी निधी व प्रशासकीय मंजुरीसाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कागदावरील रस्ता प्रत्यक्षात आणा

DP रस्ता केवळ आराखड्यात न ठेवता त्यासाठी निधी, प्रशासकीय मंजुरी आणि निश्चित कालमर्यादा जाहीर करून प्रत्यक्ष काम सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. रस्ता झाल्यास मोठ्या परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना सुरक्षित व पर्यायी मार्ग उपलब्ध होणार असल्याने महापालिकेने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!